आधी घरफाळा भागवा, मगच मृत्यूचा दाखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:38 AM2020-12-16T04:38:22+5:302020-12-16T04:38:22+5:30

कोल्हापूर : घरापासून स्मशानापर्यंत न्यायला शववाहिका मोफत, मृतदेह दहन मोफत, मृत्यूचा पहिला दाखला मोफत देण्यासारख्या मानवतावादी योजना राबविणाऱ्या महानगरपालिका ...

Pay the house tax first, then the death certificate | आधी घरफाळा भागवा, मगच मृत्यूचा दाखला

आधी घरफाळा भागवा, मगच मृत्यूचा दाखला

Next

कोल्हापूर : घरापासून स्मशानापर्यंत न्यायला शववाहिका मोफत, मृतदेह दहन मोफत, मृत्यूचा पहिला दाखला मोफत देण्यासारख्या मानवतावादी योजना राबविणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने नुकताच एक अजब फंडा शोधून काढला असून, यापुढे जर तुम्हाला मृत्यूचा व जन्माचा दाखला पाहिजे असेल तर आधी घरफाळा भरण्याची सक्ती केली आहे. घरफाळा भरल्याखेरीज तुम्हाला जन्म अथवा मृत्यूचा दाखला मिळणार नाहीच; शिवाय कोणी कर्मचाऱ्याने मानवतेच्या दृष्टीने तो देण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

महानगरपालिका नागरी सुविधा केंद्रावर कोणी जन्म अथवा मृत्यूचा दाखला मागण्यास अर्ज करीत असेल तर त्या अर्जासोबत संबंधित व्यक्तीने चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण घरफाळा भरला असल्याबाबतचा घरफाळा विभागाचा ना-हरकत दाखला असल्याशिवाय त्या नागरिकाचे जन्म अथवा मृत्यूचे दाखले मागणीचे अर्ज स्वीकारू नयेत, असा फतवा साहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी दि. १० डिसेंबरला काढला आहे. त्याची अंमलबजावणी सर्व नागरी सुविधा केंद्रांतून झाली आहे. घरफाळा भरला नसताना दाखले दिले तर महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियमाअन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा औंधकर यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

साहाय्यक आयुक्त औंधकर यांचा फतवा संताप आणणारा आहे. एकीकडे मानवतावादी दृष्टिकोनातून शववाहिका मोफत द्यायची, मृतदेह दहन मोफत करायचे, पहिला दाखला मोफत द्यायचा आणि दुसरीकडे घरफाळा भरला नाही म्हणून त्यांना दाखलाच द्यायचा नाही, ही अजब कल्पना नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरणारी आहे.

अडवणूक करणारा फतवा मागे घ्या

नागरिकांची अडवणूक करणारा फतवा मागे घ्यावा, अशी मागणी मंगळवारी माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. घरफाळा वसुलीसाठी थेट कारवाई न करता नागरिकांची अशा प्रकारे अडवणूक होऊ लागल्यास त्यातून मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच पूर्ववत दाखले देण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती परमार यांनी केली आहे.

मिळकत नाही; तरीही सक्ती !

ज्यांच्या नावावर मिळकत नाही, तरीही संबंधित व्यक्तीच्या नावाचा घरफाळा थकबाकी नसल्याचा ना-हरकत दाखला आणण्यासाठी नागरिकांना घरफाळा विभागात फेऱ्या माराव्या लागत आहेत. तेथे संबंधित कर्मचारी भेटतीलच याची शाश्वती नाही. ना-हरकत दाखला लगेच मिळेल असेही नाही. नागरिकांची त्यामुळे मोठी डोकेदुखी बनली आहे.

Web Title: Pay the house tax first, then the death certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.