७१ दिवसांच्या संप कालावधीतील वेतनाची देयके कोषागारामध्ये सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:22 AM2020-12-23T04:22:26+5:302020-12-23T04:22:26+5:30
कोल्हापूर : शिक्षकांचे ७१ दिवसांच्या संपाच्या कालावधीतील वेतन अदा करण्याची कार्यवाही राज्यात सर्वप्रथम कोल्हापूर विभागाने केली आहे. या वेतनाची ...
कोल्हापूर : शिक्षकांचे ७१ दिवसांच्या संपाच्या कालावधीतील वेतन अदा करण्याची कार्यवाही राज्यात सर्वप्रथम कोल्हापूर विभागाने केली आहे. या वेतनाची देयके कोषागार कार्यालयामध्ये सादर केली आहेत. ती मंजूर होताच संबंधित महाविद्यालयांना वर्ग करण्यात येतील. सुमारे ६५० वैद्यकीय बिले मंजूर केली असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांनी मंगळवारी दिली.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) सोमवारी शिक्षण सहसंचालक कार्यालयाविरोधात धरणे आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान या कार्यालयाने केलेल्या कामकाजाची माहिती शिक्षण सहसंचालक डॉ. उबाळे यांनी दिली. शिवाजी विद्यापीठातील सर्व शिक्षकांना शंभर टक्के क्षमतेने सातवा वेतन आयोग लागू करून त्यानुसार वेतन अदा केले आहे. जे शिक्षक विहित शैक्षणिक अर्हता धारण करीत नाहीत, स्थानिक निवड समितीमार्फत नियुक्त झालेले आहेत, अशा शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतननिश्चितीबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले असून ते प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल. रयत शिक्षण संस्था, भारती विद्यापीठ आदी संस्थांमधील शिक्षक भरतीची प्रकरणे निकाली काढली आहेत, अशी माहिती डॉ. उबाळे यांनी दिली.
चौकट
कर्मचारी बदली प्रस्तावित
सहसंचालक कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांचा सहा वर्षांचा किमान कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांची बदली २०२१-२२ मध्ये प्रस्तावित करण्यात येत आहे. ४५ टक्के पदे रिक्त असल्याने सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याची माहिती डॉ. उबाळे यांनी दिली.