कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून ११०० कोटींचे पीक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:30 PM2018-08-08T17:30:38+5:302018-08-08T17:33:11+5:30
कोल्हापूर जिल्हयातील शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामात राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खाजगी बँकाच्यामाध्यमातून जुलैअखेर अकराशे कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी बुधवारी दिली. पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट्याच्या ७९ टक्के काम झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कोल्हापूर : जिल्हयातील शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामात राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खाजगी बँकाच्यामाध्यमातून जुलैअखेर अकराशे कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी बुधवारी दिली. पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट्याच्या ७९ टक्के काम झाल्याचे त्यांनी नमूद केले.
खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १३८८ कोटी ३६ लाखाचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून गेल्या चार महिन्यात अकराशे कोटींचे पीककर्ज वाटप करुन बँकांनी विशेषत: राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे.
दोन महिन्यापूर्वी पीक कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकाचे केवळ आठ टक्के काम होते, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बँकांना पीक कर्ज वितरणाचे काम गतीमान करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपात सुधारणा करुन केवळ दोन महिन्यात हे काम ४५ टक्क्यांवर नेले आहे.
जिल्हयातील राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खाजगी बँकांनी सर्वसामान्यांचे विशेषत: शेतकऱ्यांचे हित डोळयासमोर ठेऊन कर्ज वाटपात सकारात्मक भूमीका घ्यावी, प्रत्येक व्यक्तीला विमा योजनांचा लाभ व्हावा यासाठी विमा योजनेत सर्व खातेदारांना समावेश करून घ्यावे, यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.