शेंगदाणा श्वासनलिकेत अडकून बालिकेचा मृत्यू
By admin | Published: September 17, 2014 11:29 PM2014-09-17T23:29:53+5:302014-09-17T23:45:32+5:30
माळापुडे येथील घटना : परिसरात हळहळ
बाजारभोगाव : शेंगदाणा श्वासनलिकेत अडकून गुदमरल्याने माळापुडे (ता. शाहूवाडी) येथील बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गौरी शिवाजी पाटील (वय ६) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी, रविवारी (दि. १४) दुपारी गौरी आपल्या अंगणात घरातील मुलांबरोबर खेळत होती. तेथे महिला भुईमुगाच्या शेंगा सोलण्याचे काम करीत होत्या. यावेळी जवळच खेळत असणाऱ्या गौरीने शेंगदाणे तोंडात टाकले. मात्र, त्यापैकी एक शेंगदाणा तिच्या नाकात गेला. त्यामुळे तिला श्वासोच्छ्वास घेताना त्रास होऊ लागला. ती डोळे पांढरे करू लागली. असा प्रकार लक्षात येताच वडील शिवाजी केरबा पाटील यांनी तातडीने तिला पाणी पाजले आणि स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी औषधोपचार केल्यावर थोड्या प्रमाणात आराम मिळाला. पुन्हा घरी आणल्यावर ती खेळू लागली.
सायंकाळी सातच्या सुमारास पुन्हा श्वासोच्छ्वास घेताना त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी तिला कोल्हापूरला हलविले. दोनवडे गावानजीक येताच तिला धाप वाढल्याने तेथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, औषधोपचारास कोणताच प्रतिसाद न दिल्याने तिचा मृत्यू झाला. (वार्ताहर)