शेवगा, द्राक्षे, गाजराची आवक वाढली: सणामुळे हरभरा डाळ, गुळाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 11:36 AM2020-03-10T11:36:16+5:302020-03-10T11:38:13+5:30
बाजारपेठेत हरभरा डाळीची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर शेवगा, द्राक्षे व गाजराची आवक वाढली असून, कोथिंबीर वगळता अन्य भाज्यांचे दर स्थिर राहिले, तर काकडीचे दर कमी झाले आहेत. रविवारी आठवडा बाजारातील हे चित्र आहे.
कोल्हापूर : बाजारपेठेत हरभरा डाळीची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर शेवगा, द्राक्षे व गाजराची आवक वाढली असून, कोथिंबीर वगळता अन्य भाज्यांचे दर स्थिर राहिले, तर काकडीचे दर कमी झाले आहेत. रविवारी आठवडा बाजारातील हे चित्र आहे.
लक्ष्मीपुरी येथील बाजारपेठेत फेरफटका मारल्यानंतर भाजीपाला, फळे, कडधान्यांचे दर कमी-जास्त, स्थिर असल्याचे दिसून आले. आज, सोमवारी होळीचा सण असल्याने पुरणपोळीसाठी लागणाऱ्या हरभरा डाळीची व गुळाची मागणी मोठ्या प्रमाणात होती. हरभरा डाळ ६५ ते ७० रुपये किलो व गूळ ५० ते ७० रुपये किलो असा दर होता, त्याच्या खरेदीसाठी गर्दी होती. मूग व तूरडाळीचे दर स्थिर असून, त्याची ११० रुपये किलोने विक्री सुुरू होती.
शेवगा, द्राक्षे व गाजराची मोठी आवक होती. शेवग्याची एक पेंढी १० रुपये, द्राक्षांचे दर कमी झाले असून ते ४० ते ५० रुपये किलो, गाजर ३५ ते ४० रुपये किलो होते. कोथिंबीरच्या पेंढीची किरकोळ दरवाढ झाली असून, १० ते २५ रुपये पेंढी असा दर राहिला. अन्य भाजीपाल्यांचे दर स्थिर राहिले. यामध्ये १५ रुपयांना दोन मेथीच्या पेंढ्या, वांगी, दोडका, भेंडी, गवारी यांचे दर ४० रुपये किलो, तर बटाटे, कांद्याचे दर ३० ते ४० रुपये किलो, टोमॅटोचे दर १० रुपये किलो, तर लसणाचे दर ८० ते १०० रुपये किलो असे स्थिर राहिले.
काकडी, कलिंगड, लिंबूचे दर उतरले
बाजारात काकडीची आवक वाढल्याने दरही उतरले आहेत. गेल्या आठवड्यात ५० ते ६० रुपये किलो असणारा काकडीचा दर यावेळी ४० रुपये किलो राहिला. उन्हाळा असल्याने कलिंगडची आवक वाढली असून बाजारात एक नग १० ते ३० रुपये तर लिंबूचे दरही उतरले असून १० रुपयांना ५ नग असा दर बाजारात होता.
फळांचे दरही स्थिर
सफरचंद १२० ते १४० रुपये एक किलो, डाळींब १२० रुपये किलो व चिकू ६० ते ७० रुपये किलो व पेरू ६० ते ८० रुपये किलो असे फळांचे दरही बाजारात स्थिर राहिले.