फेरीवाल्यांचा शिवाजी चौकात ‘एल्गार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:53+5:302021-02-09T04:25:53+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमणावरील कारवाईला विरोध करण्यासाठी सोमवारी ऐतिहासिक शिवाजी चौकात हजारो फेरीवाल्यांनी एकत्र येऊन ठिय्या मारला. अद्यापही बायोमेट्रीक ...

Peddlers 'Elgar' in Shivaji Chowk | फेरीवाल्यांचा शिवाजी चौकात ‘एल्गार’

फेरीवाल्यांचा शिवाजी चौकात ‘एल्गार’

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमणावरील कारवाईला विरोध करण्यासाठी सोमवारी ऐतिहासिक शिवाजी चौकात हजारो फेरीवाल्यांनी एकत्र येऊन ठिय्या मारला. अद्यापही बायोमेट्रीक कार्ड वाटप केलेली नाहीत. फेरीवाला कृती समितीसोबत चर्चा नाही. तरीही महापालिकेने कारवाई सुरू केली तर सर्वांनी मिळून विरोध करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दरम्यान, महापालिका प्रशासकांना भेटण्याचेही ठरले.

महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रशासनाला सोमवारपासून शहरातील अतिक्रमणावर कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाईला सर्वपक्षीय फेरीवाल्यांनी विरोध केला आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच हजारोंच्या संख्येने फेरीवाले शिवाजी चौकात जमा झाले. शिवाजी मार्केटच्या पार्कींगमध्ये त्यांनी ठिय्या मारला. यावेळी कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, १९९३ मध्ये फेरीवाल्यानी कोणत्या ठिकाणी व्यवसाय करायचा हे निश्चित केले होते. आजपर्यंत याची अंमलबजावणी केलेली नाही. असे असताना कृती समितीसोबत चर्चा न करताच महापालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तो आम्हांला मान्य नाही. फेरीवाल्यांवर अन्याय होऊ देणार नाही. कृती समिती खंबीरपणे पाठीशी राहील. माजी नगरसेवक अशोक भंडारे म्हणाले, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत जाधव यांनी शहरातील फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई करू नये अशी सूचना प्रशासनाला केली आहे. तरीही कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू.

किशोर घाटगे म्हणाले, फेरीवाला समितीच्या परवानगीशिवाय महापालिकेला कारवाई करता येत नाही. अशी कारवाईच बेकायदेशीर ठरते. त्यामुळे कारवाई करण्यात आल्यास फेरीवाले त्यांना जशास तसे उत्तर देतील.

दिलीप पवार म्हणाले, काेरोनामध्ये देशाची आर्थिक घडी बसविण्याचे काम फेरीवाल्याने केले. आत्मनिर्भर योजनेतून फेरीवाल्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाला दिले हाेते. यावेळी कृती समितीच्या मदतीमुळे ते शक्य झाले. महापालिकेने कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. फेरीवाल्यांना कारवाईची धमकी देऊ नये. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आता मागे हटायचे नाही.

यावेळी प्र. द. गणपुले, माजी महापौर नंदकुमार वळंजू, किरण गवळी, राजू जाधव, धनाजी दळवी, सुरेश जरग यांनी मनोगत व्यक्त केले. रघुनाथ कांबळे, महंमदशरीफ शेख, रियाज कागदी आदी उपस्थित होते.

चौकट

अनधिकृत फेरीवल्यांना पाठीशी घालणार नाही

महापालिकेकडून शहरातील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणावेळी अनेकांनी कागदपत्रे दिलेली नाहीत. शिवाजी मार्केटमध्ये त्यांच्यासाठी सुविधा केली होती. कागदपत्र जमा करण्याचे आवाहनही केले. त्यालाही काहींनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ५६०० इतके फेरीवाले अधिकृत झाले असून त्यांनाच पुढील पाच वर्षे व्यवसाय करता येणार आहे. उर्वरित फेरीवाले अनधिकृत ठरले असून त्यांच्या पाठीशी कृती समिती राहणार नाही, असे आर. के. पोवार यांनी स्पष्ट केले. काही परस्परच केबिन टाकत असून येथून कृती समितीच्या परवानगी शिवाय कोणीही असा प्रकार करू नये, असेही आवाहन त्यांनी केले.

चौकट

तर आत्मनिर्भर कर्ज महापालिका भरणार काय?

केंद्र शासनाने कोरोना काळात फेरीवाले अडचणीत असल्याने त्यांना १० हजार रुपये आत्मनिर्भर योजनेतून कर्ज दिले. राज्यात कोल्हापुरातील फेरीवाल्यांनी सर्वाधिक लाभ मिळवून दिला असे महापालिका प्रशासन सांगत आहे. मग आमच्यावर कारवाई करून या कर्जाचे हप्ते महापालिका भरणार आहे काय? असा संतप्त सवाल नजीर देसाई यांनी केला.

फोटो : ०८०२२०२१ कोल केएमसी फेरीवाले आंदोलन१

ओळी : कोल्हापुरातील हजारो फेरीवाल्यांनी सोमवारी शिवाजी चौकात एकत्र जमून महापालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार केला.

फोटो : ०८०२२०२१ कोल केएमसी फेरीवाले आंदोलन२

ओळी : कोल्हापुरातील शिवाजी चौकात महापालिकेच्या नियोजित कारवाईला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने फेरीवाले एकत्र आले होते. यावेळी दिलीप पवार यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Peddlers 'Elgar' in Shivaji Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.