महाद्वार चौकातील फेरीवाल्यांची कोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:35 AM2021-02-26T04:35:22+5:302021-02-26T04:35:22+5:30

कोल्हापूर : महाद्वार चौकातील फेरीवाल्यांसंदर्भातील कोंडी कायम आहे. महाद्वार चौकापासून २५ मीटरपर्यंत एकाही फेरीवाल्यास बसू देणार नाही, अशी भूमिका ...

The peddlers in Mahadwar Chowk are still stuck | महाद्वार चौकातील फेरीवाल्यांची कोंडी कायम

महाद्वार चौकातील फेरीवाल्यांची कोंडी कायम

Next

कोल्हापूर : महाद्वार चौकातील फेरीवाल्यांसंदर्भातील कोंडी कायम आहे. महाद्वार चौकापासून २५ मीटरपर्यंत एकाही फेरीवाल्यास बसू देणार नाही, अशी भूमिका प्रशासनाची आहे, तर केवळ महाद्वार चौकात बंदी घालून चौकापासून पुढे फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मुबा देण्याची मागणी फेरीवाला सर्व पक्षीय कृती समितीची आहे. १०० मीटरवरून २५ मीटरपर्यंत तोडगा निघाला असताना आता नव्याने फेरीवाल्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने येथील कोंडी कायम आहे. गुरुवारी महापालिकेच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती. प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर मात्र सर्व फिस्कटले.

महापालिका प्रशासनाने अंबाबाई मंदिर येथील २५ मीटर परिसर फेरीवालामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील फेरीवाल्यांना २५ मीटर पुढे पुनर्वसन करण्यात येणार आहे. मात्र, तेथील फेरीवाल्यांचा महाद्वार चौकातील फेरीवाल्यांना बसण्यासाठी विरोध होत आहे. महाद्वार चौकातील फेरीवाल्यांसह शहरातील अतिक्रमणावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आठ दिवसांपूर्वी बैठक झाली होती. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी फेरीवाले आणि महापालिका यांनी बैठक घेऊन जागेवर पाहणी करून समन्वयाने तोडगा काढावा, अशा सूचना केल्या. यानुसार गुरुवारी महापालिकेत प्रशासन, फेरीवाले, शहर वाहतूक शाखा यांच्यासमवेत बैठक झाली. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, इस्टेट विभागचे सचिन जाधव, आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, दिलीप पवार, प्र. द. गणपुले, समीन नदार, नजीर देसाई उपस्थित होते.

चौकट

१०० मीटरवरील सर्वांनाच हटवू

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी २५ मीटर पुढे महाद्वार चौकातील फेरीवाल्यांचे पुनर्वसनासाठी नकाशे तयार करू, फेरीवाल्यांची संख्या आणि १ बाय १ चौकन आखून मार्ग काढू, मात्र, महाद्वार चौकातच फेरीवाल्यांना बसविले पाहिजे अशी भूमिका घेतल्यास महाद्वार चौकातून १०० मीटरच्या सर्व फेरीवाल्यांना हटवावे लागेल, असा इशारा दिला.

२५ मीटरवरूनही मतभेद

फेरीवाल्यांनी महापालिका प्रशासनाने ठरवून दिलेले २५ मीटर अंतराबाबत शंका उपस्थित केली. गरुड मंडप की महाद्वार चौक येथून मोजणी करायची यावर मतभेद आहेत. १५ दिवसांपूर्वी यावर एकमत झाले होते. केवळ आवळे, चिंच आणि रांगोळी विक्रेत्यांचा प्रश्न आहे. जागेवर जाऊन तो सोडवू, असा निर्णय महापालिकेत झालेल्या बैठकीत झाला. सविस्तर चर्चाही झाली. प्रत्यक्षात जागेवर गेल्यावर फेरीवाल्यांनी २५ मीटरचे अंतरही कमी करण्याची मागणी केली. याला महापालिका प्रशासनाने विरोध दर्शविला.

चौक़ट

महाद्वार चौकात वादावादी

महापालिकेने शेतकरी सेवा संघाच्या भांडी दुकानापर्यंत २५ मीटर अंतरावर पट्टा मारला आहे. त्याच्या आत फेरीवाल्यांना व्यवसायास अटकाव केला. असे असताना गुरुवारी महाद्वार चौक केवळ फेरीवाला मुक्त करा, त्याच्या पुढील सर्व फेरीवाल्यांना पट्टे मारून व्यवसायाची मुबा द्या, अशी भूमिका फेरीवाल्यांनी घेतली. याला अतिक्रमण पथकाचे पंडित पोवार यांनी अक्षेप घेतला. ते म्हणाले, १०० मीटरवरून २५ मीटर अंतर केले. यावर एकदा तोडगा निघाला असताना पुन्हा अंतर कमी करणे चुकीचे आहे. यावर फेरीवाल्यांसोबत त्यांचा वाद झाला.

फोटो : २५०२२०२१ कोल फेरीवाला वाद

ओळी : कोल्हापुरातील महाद्वार चौकातील फेरीवाल्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी गुरुवारी येथे फेरीवाले, महापालिका अधिकारी यांनी पाहणी केली.

Web Title: The peddlers in Mahadwar Chowk are still stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.