भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी ठार, आयसोलेशन रिंग रोडवर दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 07:05 PM2020-06-11T19:05:58+5:302020-06-11T19:08:32+5:30
पायी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव ट्रकने ठोकरल्याने तो जागीच ठार झाला. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आयसोलेशन रिंग रोडवर छत्रपती चौकात घडली. भीमराव धोंडीराम सातारकर (वय ५८, रा. शाहूनगर) असे या ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बुधवारी (दि. १०) आपल्या सुभाषनगर येथील मनीषानगरमधील मुलीकडे राहण्यासाठी आले होते. दुर्घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कोल्हापूर : पायी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव ट्रकने ठोकरल्याने तो जागीच ठार झाला. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आयसोलेशन रिंग रोडवर छत्रपती चौकात घडली. भीमराव धोंडीराम सातारकर (वय ५८, रा. शाहूनगर) असे या ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बुधवारी (दि. १०) आपल्या सुभाषनगर येथील मनीषानगरमधील मुलीकडे राहण्यासाठी आले होते. दुर्घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
याबाबत माहिती अशी की, भीमराव सातारकर हे रिंग रोडवरील बसथांब्यावर बसले होते. एसएससी बोर्डाकडून राधानगरीकडे भरधाव जाणारा ट्रक छत्रपती चौकातील गतिरोधकाजवळ आला. याच वेळी सातारकर हे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी त्यांना ट्रकने ठोकर दिल्यामुळे ते जागीच ठार झाले.
परिसरातील नागरिकांनी, महिलांनी दुर्घटनास्थळी मोठी गर्दी केली. तेव्हा मनीषानगरमधील मुलीकडे ते बुधवारी राहण्यासाठी आल्याची माहिती पुढे आली. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून विच्छेदनासाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयामध्ये नेण्यात आला आहे. मृत भीमराव सातारकर यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.
मुलीचा आक्रोश
दुर्घटनास्थळी गर्दी झाली होती. त्यावेळी मनीषानगरमधील एका महिलेने रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहून आक्रोश केला. त्यावेळी ते तिचेच वडील असल्याचे स्पष्ट झाले. तिथे मुलीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.