‘महाद्वार’पासून शंभर मीटर अंतरात फेरीवाल्यांना व्यवसाय बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:27 AM2021-02-09T04:27:35+5:302021-02-09T04:27:35+5:30
कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या पश्चिमेला असलेल्या महाद्वार चौकापासून तीन्ही रस्त्यांवर शंभर मीटर अंतरात कोणत्याही फेरीवाल्यास व विक्रेत्यास व्यवसायाला ...
कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या पश्चिमेला असलेल्या महाद्वार चौकापासून तीन्ही रस्त्यांवर शंभर मीटर अंतरात कोणत्याही फेरीवाल्यास व विक्रेत्यास व्यवसायाला बंदी घालण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी आज, मंगळवारपासून होणार आहे. त्यामुळे फेरीवाले आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. हा प्रश्न चर्चेतून सोडविण्याऐवजी एकतर्फी निर्णय घेत असल्याबद्दल फेरीवाल्यांत कमालीचा असंतोष आहे.
कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे ताराबाई रोड, महाद्वार रोड येथील फेरीवाले, विक्रेते यांचा व्यवसाय अनेक महिने पूर्णत: बंद राहिला. दिवाळीत काहीसे नियम शिथिल करून तात्पुरत्या स्वरूपात फेरीवाले व विक्रेते यांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली, परंतु दिवाळीनंतर चर्चेतून मार्ग काढण्याचा निर्णय झाला होता. नंतर आयुक्त बदलले आणि प्रशासक म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कार्यभार स्वीकारला. बलकवडे यांनी गेल्या आठवड्यात शहरातील सर्वच अतिक्रमणे सोमवारपासून हटविण्याचे आदेश दिले. त्यामुळे फेरीवाले, विक्रेते हवालदिल झाले आहेत.
प्रशासक बलकवडे रजेवर असल्यामुळे गेल्या आठवड्यात फेरीवाला कृती समितीच्या सदस्यांची भेट झाली नाही. सोमवारी दिवसभर कार्यालयात असूनही बलकवडे यांच्याशी चर्चा झाली नाही. परंतु त्यांनी महाद्वार चौकापासून तिन्ही रस्त्यांवर शंभर मीटर परिसराबाहेर फेरीवाल्यांना एक मीटर बाय एक मीटर अंतराचे पांढरे पट्टे मारून देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानुसार सोमवारी रात्री हे काम हाती घेण्यात आले. सोमवारी दिवसभर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी या रस्त्यावर थांबून होते. त्यामुळे कारवाईची चाहूल फेरीवाल्यांना लागली आहे.
आज, मंगळवारी सकाळी ताराबाई रोडवर मित्रप्रेम तरुण मंडळापासून पुढे साकोली कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर, महाद्वारपासून बिनखांबी गणेशमंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कामत हॉटेलच्या पुढे, तर उत्तरेस मोहन रेस्टॉरंटच्या पुढे फेरीवाले व विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्यात येणार आहे. आखून दिलेल्या जागेतच त्यांनी व्यवसाय करायचा आहे, जर फेरीवाले, विक्रेत्यांनी सहकार्य केले नाही, तर मात्र कारवाई करण्याचे आदेश प्रशासक बलकवडे यांनी दिले आहेत.