पाकाळणी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:59 AM2018-04-16T00:59:13+5:302018-04-16T00:59:13+5:30
जोतिबा : ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा पाकाळणी रविवार उत्साहात साजरी झाली. आज, सोमवारी मंदिर स्वच्छता करून उद्या, मंगळवारी महाप्रसाद वाटपाने चैत्र यात्रेची सांगता होणार आहे. जोतिबा देवाचा तिसरा रविवार पाकाळणीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी जोतिबा मंदिरात मोठी गर्दी केली. सकाळी अभिषेक, महापूजा, धुपारती सोहळा झाला. मंदिरासभोवती चारपदरी दर्शनरांगा लागल्या होत्या. दुपारी १२नंतर मंदिराबाहेरील ठाकरे मिटके गल्लीपर्यंत दर्शनरांग लागली. सायंकाळी सात वाजता धुपारती झाली. रात्री ८.३० वाजता जोतिबा देवाची पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. श्रींचे मुख्य पुजारी, उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजम्यासह पालखी निघाली. भाविकांनी गुलाल, खोबऱ्यांची उधळण करून ‘चांगभलं’चा गजर केला. यावेळी देवस्थान समिती कार्यालयाचे प्रभारी महादेव दिंडे, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी आर. टी. कदम, गावकर, ग्रामस्थ, पुजारी व भाविक उपस्थित होते. तोफेच्या सलामीने पालखी सोहळ्याची सांगता झाली.
रात्री दहा वाजता स्थानिक ग्रामस्थ पुजारी ‘खंडकरी’ सेवा मंडळाच्या ५०० ते ६०० कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे हातात झाडू घेऊन संपूर्ण मंदिराची स्वच्छता केली. रात्री उशिरापर्यंत ही स्वच्छता मोहीम चालू होती.
आज नित्य पारंपरिक पद्धतीने पाण्याचे फवारे मारून मंदिर स्वच्छ केले जाणार आहे. मंदिर गाभारा, शिखरे, दीपमाळ, देवता कृत्य साहित्यांची स्वच्छता केली जाणार आहे. मंदिरातील विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. काही काळ जोतिबा दर्शन बंद राहील. उद्या जोतिबा समस्त पुजारी यांच्यावतीने गाव भंडारा होणार आहे. भाविकांनी या गाव भंडारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानाचे दहा गावकरी यांनी केले आहे. दुपारी दोन वाजता स्थानिक पुजारी मंडळाच्या सासनकाठीची मिरवणूक निघेल. रात्री भजन व डवरी गीतांचा कार्यक्रम होईल.