खासगी ‘शिवशाही’ बस कंपनीवर होणार दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 06:01 PM2018-07-10T18:01:19+5:302018-07-10T18:03:12+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करीत, एस.टी. महामंडळाच्या गारगोटी आगारातील ‘शिवशाही’च्या खासगी बसचालकांनी सोमवारी (दि. ९) ‘काम बंद’ आंदोलन केले. यामुळे ‘शिवशाही’च्या बसफेऱ्या अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे नाहक हाल झाले. या काम बंद आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित खासगी शिवशाही कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करीत, एस.टी. महामंडळाच्या गारगोटी आगारातील ‘शिवशाही’च्या खासगी बसचालकांनी सोमवारी (दि. ९) ‘काम बंद’ आंदोलन केले. यामुळे ‘शिवशाही’च्या बसफेऱ्या अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे नाहक हाल झाले. या काम बंद आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित खासगी शिवशाही कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाडेतत्त्वावर ७०० शिवशाही एस.टी. बसेस आपल्या ताफ्यात घेतल्या आहेत. कोल्हापूर विभागात चार खासगी कंपन्यांकडून ३८ शिवशाही गाड्या विविध मार्गांवर धावत आहेत. गारगोटी येथील खासगी शिवशाही बसचालकांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळत नाही व गाड्या नादुरुस्त असल्याच्या कारणातून त्यांनी काम बंद आंदोलन केले.
परिणामी पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ‘शिवशाही’च्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. खासगी कंपनी व महामंडळातील झालेल्या करारानुसार अचानक गाडी फेऱ्या रद्द झाल्याने संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करणार आहे. मात्र प्रशासनाने वेळीच खासगी शिवशाही गाड्यांसंबंधित अशा घटनांना आळा घालणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.