बंदी असताना प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:38 AM2019-10-03T11:38:58+5:302019-10-03T11:40:07+5:30
प्लास्टिकमुक्त शहर करण्याच्या महापालिकेच्या संकल्पाबाबत गेल्या महिन्याभरापासून जनजागृती केली जात आहे. आता बुधवारपासून शहरात प्लास्टिक विकण्यास बंदी केल्यामुळे यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी दोन विक्रेत्यांना दंड करण्यात आला. आज, गुरुवारपासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : प्लास्टिकमुक्त शहर करण्याच्या महापालिकेच्या संकल्पाबाबत गेल्या महिन्याभरापासून जनजागृती केली जात आहे. आता बुधवारपासून शहरात प्लास्टिक विकण्यास बंदी केल्यामुळे यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी दोन विक्रेत्यांना दंड करण्यात आला. आज, गुरुवारपासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
केंद्रशासनाने गांधी जयंतीपासून देशात प्लास्टिकबंदी केली आहे. राज्य शासनानेही यापूर्वीच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वतीने याची अंमलबजावणी सुरू आहे. केंद्रशासनाच्या आदेशानुसार आता ही कारवाईची मोहीम आणखीन तीव्र करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी या मोहिमेअंतर्गत शिवाजी चौक येथील अंबिका स्वीट्स व जोतिबा रोड लक्ष्मी मंदिर येथील गजलक्ष्मी साडी सेंटर यांच्यावर प्लास्टिकविरोधी पथकाने कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे दंड वसूल केला.
महानगरपालिका आरोग्य विभागाने प्लास्टिक विक्रीला आळा घालण्याकरिता ११ पथके स्थापन केली असून, रोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही पथके अचानक दुकाने, कारखाने यांची तपासणी करणार आहेत. एकदा कारवाई झाल्यानंतर तोच विक्रेता पुन्हा सापडला, तर त्याच्यावर पाच, १0, १५ हजार रुपये असा दंड केला जाणार आहे. या कारवाईचे रेकॉर्ड तयार केले जाणार आहे.
प्लास्टिकचा वापर टाळा
केंद्र तसेच राज्यसरकारच्या निर्णयानुसार कोल्हापूर शहरात याची अंमलबजावणी कडक केली जाणार आहे; त्यामुळे नागरिक, दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा. यापुढे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे; त्यामुळे प्लास्टिक शक्यतो कापडी पिशव्यांचा तसेच पर्यायी साधनांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.