ॲट्रॉसिटीची प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:26 AM2021-03-23T04:26:16+5:302021-03-23T04:26:16+5:30
कोल्हापूर : पोलिसांनी तपासावरील प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत, या प्रकरणांचा निपटारा लवकरात-लवकर होण्यासाठी कागदपत्रे समाज कल्याण विभागाला सादर ...
कोल्हापूर : पोलिसांनी तपासावरील प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत, या प्रकरणांचा निपटारा लवकरात-लवकर होण्यासाठी कागदपत्रे समाज कल्याण विभागाला सादर करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिली. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, महिला व बाल विकासचे निरीक्षक बी.जी. काटकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी २१ प्रकरणांचा आढावा घेतला. ते म्हणाले, तसेच न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे वगळता तपासावर प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे पोलीस विभागाने लवकरात लवकर मार्गी लावावीत. दोषारोप पत्र पाठवावे जेणेकरून पीडितांना अर्थसहाय्य देता येईल.
विशाल लोंढे यांनी सविस्तर आढावा दिला. यात अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध १९८९) ॲट्रॉसिटी अंतर्गत व नागरी हक्क संरक्षण अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या सद्य:स्थितीबाबत समावेश होता. जानेवारी महिन्यात १२ प्रकरणांपैकी ६ मंजूर असून पोलिसांकडील कागदपत्रांअभावी ६ प्रलंबित प्रकरणे आहेत. फेब्रुवारीमधील प्राप्त ९ प्रकरणे कागदपत्राअभावी प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
--
फोटो नं २२०३२०२१-कोल-समाज कल्याण बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बी.जी. काटकर, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विशाल लोंढे, दीपक घाटे उपस्थित होते.
--