कोळींद्रे मतदार संघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:45+5:302021-07-02T04:17:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : कोळींद्रे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सुनीता रेडेकर यांचा वाढदिवस व कृषीदिनानिमित्त गुरुवारी विविध विकासकामांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : कोळींद्रे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सुनीता रेडेकर यांचा वाढदिवस व कृषीदिनानिमित्त गुरुवारी विविध विकासकामांचे उद्घाटन, शेतकऱ्यांचा सत्कार व प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक रमेश रेडेकर होते. मतदारसंघात १२ कोटींची विकासकामे केली असून, प्रलंबित कामे मार्गी लावणार आहे, असे जिल्हा परिषद सदस्य सुनीता रेडेकर यांनी सांगितले.
हत्तीवडे सावरवाडी रस्ता, बोलकेवाडी येथील दलित वस्ती रस्ता व नवीन अंगणवाडी इमारत तर हत्तीवडे येथे शाळा आणि आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती या १ कोटीच्या विकासकामांचा प्रारंभ सुनीता रेडेकर यांच्या हस्ते झाला. हत्तीवडे येथील कार्यक्रमात मतदार संघातील २१ शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या अंतर्गत ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी टॅबचे वाटप, कृषी दिन आणि ‘डॉक्टर्स-डे’चे औचित्य साधून या क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
आदित्य रेडेकर यांनी प्रास्ताविकात गेल्या चार वर्षांतील कामाचा आढावा घेतला. कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी सुनीता रेडेकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. उद्योजक रमेश रेडेकर, आजऱ्याच्या नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत, आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला सरपंच शकुंतला सुतार, लक्ष्मण गुडूळकर, समीर पारदे, प्रमिला अजगेकर, राजू जाधव, वैशाली धडाम, जयश्री फडके, अजित हरेर, सुनील पाटील, विजय पाटील, संजय रेडेकर, तातूअण्णा बटकडली यांच्यासह विविध गावचे सरपंच व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती चव्हाण व शिवणे गुरुजी यांनी केले. युवराज जाधव यांनी आभार मानले.
फोटो ओळी : हत्तीवडे (ता. आजरा) येथील रस्ता कामाचे उद्घाटन सुनीता रेडेकर यांनी केले. यावेळी ज्योत्स्ना चराटी, रमेश रेडेकर, आदित्य रेडेकर यांच्यासह मतदार संघातील सर्व गावचे सरपंच उपस्थित होते.
क्रमांक : ०१०७२०२१-गड-०७