कोल्हापूर जिल्ह्यातील ४.५९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन जमा, लाभापासून वंचित किती.. जाणून घ्या
By राजाराम लोंढे | Published: June 20, 2024 06:36 PM2024-06-20T18:36:24+5:302024-06-20T18:38:40+5:30
अद्याप ६११० शेतकऱ्यांची ‘केवायसी‘ प्रलंबित
राजाराम लोंढे
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पी. एम. किसान पेन्शन योजनेचा १७ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे. जिल्ह्यातील ४ लाख ५९ हजार ३१७ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग होणार असून अद्याप ६ हजार ११० शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण असल्याने त्यांना लाभापासून वंचित रहावे लागले आहे. येत्या आठवडाभरात बँकनिहाय पैसे वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या भूमिकेतून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना महिन्याला ५०० रुपये असे चार महिन्याला दोन हजार रुपये पी. एम. किसान पेन्शन योजना सुरू केली. ज्याच्या नावावर सातबारा आहे, त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळतो. पण, सरकारी, निमसरकारी, शासकीय पेन्शनधारक, आयकर परतावा करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यात साडेपाच लाखांहून अधिक शेतकरी पात्र ठरले होते. केंद्र सरकारच्या वतीने संबंधित लाभार्थ्यांची तपासणी केल्यानंतर सरकारी, निमसरकारी आदी लाभार्थी सापडले. त्यांची पेन्शन रद्द करण्यात आली असून शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना आता लाभ मिळत आहे.
आतापर्यंत पेन्शनचे १७ हप्ते आले असून केंद्र सरकारने मंगळवारी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ४ लाख ५९ हजार ३१७ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.
कृषी विभागाने केले गतीने काम
मध्यंतरी वर्ष-दीड वर्षे पी. एम. किसान पेन्शन योजनेचे काम कोणी करायचे? यावरून महसूल व कृषी विभागात वाद सुरू होता. त्यामुळे लाखो पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. राज्य शासनाच्या पातळीवर हा विषय कृषी विभागाकडे सोपवण्यात आला आणि कामाला गती मिळाली.
कृषी सहायकांशी संपर्क साधा
मोठे शेतकरी वगळून सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. ज्याच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांनी गावातील कृषी सहायकांशी संपर्क साधून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली तर त्यांना पेन्शन सुरू होऊ शकते.
तालुकानिहाय पेन्शनधारक लाभार्थी -
तालुका - एकूण पात्र - १७ वा हप्ता जमा
आजरा - २९,०३९ - २७,५९२
भुदरगड - ३२,२९९ - ३०,५२५
चंदगड - ३९,६०३ - ३७,८०९
गडहिंग्लज - ४७,५१९ - ४५,०९८
गगनबावडा - ७,२५६ - ६,९८६
हातकणंगले - ४९,३८५ - ४६,७५२
कागल - ४८,९४२ - ४७,५५०
करवीर - ६२,९८४ - ५९,७७०
पन्हाळा - ४७,४०६ - ४४,२३७
राधानगरी - ४०,७५९ - ३८,८७६
शाहूवाडी - ३३,४५४ - ३१,०८१
शिरोळ - ४५,०११ - ४३,०४१