corona virus-शाळा बंदचा निर्णय तरिही विद्यार्थी शाळेत, शिक्षकांच्या सुचनेनंतर गेले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 01:57 PM2020-03-16T13:57:39+5:302020-03-16T14:12:07+5:30
परदेशातून आलेल्यांनी ‘सीपीआर’ येथील कक्षात वैद्यकीय तपासणी करून १४ दिवस घरातच थांबावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
कोल्हापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी शहरापाठोपाठ आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था सोमवारपासून बंद होत्या. शाळा बंद असा आदेश आहे, तरिही आज अनेक विद्यार्थी शाळेत आले. त्यांना पुढिल तारखेपर्यंत शाळा बंद राहणार असे सांगण्यात आले. त्यानंतर ते विद्यार्थी परत गेले.
दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी हा निर्णय लागू राहणार नाही, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. परदेशातून आलेल्यांनी ‘सीपीआर’ येथील कक्षात वैद्यकीय तपासणी करून १४ दिवस घरातच थांबावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कोरोना’संदर्भात पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आदी उपस्थित होते.
आंबोली, बेळगाव यासारख्या सीमेवरील भागातून परदेशातून आलेले जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लोक येऊ शकतात. त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
ते पुढे म्हणाले, परदेशातून येणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्वत:हूून प्रशासनाला माहिती द्यावी. त्याचबरोबर स्वत:चे स्क्रीनिंग (वैद्यकीय तपासणी) करून घ्यावी. आपली माहिती लपवू नये. कारण त्यामुळे सर्वप्रथम स्वत:च्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यांनी स्वत:च घरी १४ दिवस विलगीकरण व्हावे.
पाच खासगी रुग्णालयांत स्क्रीनिंगची सुविधा
‘सीपीआर’सह इतर पाच खासगी रुग्णालयातही ‘कोरोनासदृश रुग्ण तपासणी कक्ष’ स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये अॅस्टर आधार हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अथायू हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल, अॅपल सरस्वती हॉस्पिटल यांचा समावेश आहे. या ठिकाणीही परदेशाहून आलेल्यांचे स्क्रीनिंग (वैद्यकीय तपासणी) होणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
आतापर्यंत ११८ जणांची तपासणी
आतापर्यंत ११८ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये परदेशातून ११४ जणांसह इतर ठिकाणाहून आलेल्या ४ जणांचा समावेश आहे. विलगीकरण कक्षात ३ जण दाखल असून ६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दोन संशयितांचे अहवाल निगेटिव्ह व दोन रिजेक्ट करण्यात आले आहेत. सध्या कोणताही धोका नसल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.