राज्य व केंद्रातील भ्रष्ट जुमला सरकारमुळे जनता मेटाकुटीला, रोहिणी खडसे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:04 PM2024-01-24T12:04:44+5:302024-01-24T12:05:26+5:30
समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार
कोल्हापूर : राज्य व केंद्रातील भ्रष्ट जुमला सरकारमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. महागाईने टोक गाठले असताना हे सरकार भावनिक वातावरण करून दिशाभूल करत आहे. महागाईची झळ आपणा सर्वांना सहन करावी लागत असून, आता थांबायचे नाही, दुर्गेचे रूप घेऊन जुमला सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा मेळावा मंगळवारी झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील होते.
राेहिणी खडसे म्हणाल्या, या वयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा संघर्ष सुरू आहे. पक्षातून काही लोक बाजूला गेले असले तरी पुन्हा नेटाने उभे राहण्यासाठी त्यांनी पायाला भिंगरी लावली आहे. तुम्हीही भाजप सरकारविरोधात गावागावांत जाऊन रान उठवा. कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या लबाड सरकारला सत्तेवरून खाली खेचायचे आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार आसूड ओढला. महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने यांनी प्रास्ताविक केले. महिला शहराध्यक्ष पद्मा तिवले यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्नेहा देसाई, सुचित्रा पडवळ, वैशाली पाटील, शर्मिला सावंत, सुलोचना पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्मिता आवळे, शिंगणापूरच्या सरपंच रसिका पाटील, भावना गाडेकर, अमर पाटील आदी उपस्थित होते.
झेंड्याची दोरी पवार यांच्यामुळेच
महिलांना पूर्वी पाळण्याची दोरी असायची; पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मानाची पदे मिळाली. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी तिच्या हाती झेंड्याची दोरी आल्याचे प्रा. म्हेत्रे यांनी सांगितले.
समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार
‘इंडिया आघाडी’च्या नेत्यांमध्ये कोणती जागा कोणाला, याबाबत अनेक वेळा चर्चा झालेली आहे. थाेड्याच दिवसांत अंतिम निर्णय होईल. व्ही. बी. पाटील यांचे काम चांगले आहे. आमचा त्यांच्यासाठी प्रयत्न राहणार आहे; पण शेवटी समन्वयाने ‘कोल्हापूर’चा उमेदवार निश्चित केला जाईल, असे खडसे यांनी सांगितले.