पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग
By Admin | Published: September 20, 2014 12:06 AM2014-09-20T00:06:43+5:302014-09-20T00:28:28+5:30
बिदरी : किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवात विविध पुरस्कारांचे वितरण
कोल्हापूर : पर्यावरणाचा जेव्हा ऱ्हास होतो किंवा नदीचे प्रदूषण होते, त्यावेळी फक्त स्थानिक प्रशासनाला दोष दिला जातो; पण पर्यावरण संवर्धन ही फक्त प्रशासनाच्या प्रयत्नाने साधणारी गोष्ट नाही, तर त्यासाठी लोकसहभागही आवश्यक आहे. कोल्हापूरकरांनी लोकसहभागातून ही चळवळ पुढे नेली याचा मला विशेष अभिमान आहे, असे मत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केले.
शाहू स्मारक भवनात किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्या बोलत होत्या. यावेळी गजानन जोशी, मिलिंद यादव आणि ‘देवराई’ या संस्थेला वसुंधरा मित्र पुरस्काराने, तर राणिता चौगुले, भाग्यश्री पाटील, आबा कांबळे यांना वसुंंधरा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संयोजक वीरेंद्र चित्राव, चंद्रकांत जोशी, दिलीप बापट, कृष्णा गावडे, प्रकाश राव उपस्थित होते.
बिदरी म्हणाल्या, अनेकदा नागरिक एखाद्या प्रश्नावरून प्रशासनाशी फक्त भांडतात; पण त्याबद्दल उपाय सांगत नाहीत; पण सुदैवाने कोल्हापुरातील पर्यावरणवादी लोक उपाययोजना सांगतात, त्यात सक्रिय होतात. पंचगंगा प्रदूषणाचा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. मात्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात प्रशासनाला यश आले. एक नागरिक म्हणून आपण कधी नदी, नाले, ड्रेनेज बघायला जात नाही; पण अधिकारी म्हणून मी कोल्हापुरात हे सगळं पाहिलं आणि खूप काही शिकलेही.
भाग्यश्री पाटील म्हणाल्या, आम्ही कोडोली मतदारसंघात प्लास्टिकमुक्तीसाठी महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे आम्ही हा उपक्रम यशस्वीपणे राबवू शकलो. आबा कांबळे यांनी गो-हत्या बंदीप्रमाणेच गाय-म्हैस अशा जनावरांच्या विक्रीवरही बंदी आणली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. उदय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
महोत्सवात आज दिवसभरात अरायव्हिंग, ग्रिनी द ग्रेट, टिंबकटू, रिटर्न आॅफ द क्लाउडेड असे ११ लघुपट दाखविण्यात आले. (प्रतिनिधी)
कोल्हापूर : येथील श्री भगवान महावीर मानव सेवा उपचार केंद्र आणि शॅल्बी हॉस्पिटल्स् (अहमदाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी
(दि.२१) सकाळी दहाला सम्राटनगरमधील उपचार केंद्रात मोफत गुडघे तपासणी शिबिर होणार आहे. उपचार केंद्राच्या दशकपूर्तीनिमित्त राजस्थानी जैन श्वेतांबर समाजाने या शिबिराचे आयोजन केले आहे.
या केंद्राच्या दवाखान्याची सुरुवात डॉ. अशोक शहा, विकास पारेख यांनी केली. याठिकाणी दहा रुपये इतक्या अल्पमोबदल्यात रुग्णांची तपासणी आणि दोन दिवसांचे औषध दिले जाते. येथे डॉ. नीलेश शहा, रोहन अथणे, अपर्णा जामकर, अपर्णा तिवडे व परिचारिका संगीता सावंत, रंजना यादव कार्यरत आहेत. सकाळी दहाला डॉ. श्रीधर देवधर यांचे व्याख्यान, डॉ. गज्जर, श्रीरंग देवधर, जयेश पाटील रुग्णांची तपासणी करणार आहेत.
शिबिरात येताना रुग्णांनी गुडघ्याचा डिजिटल एक्स-रे आणणे गरजेचे आहे. शिबिरासाठी रुग्णांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सम्राटनगरमधील उपचार केंद्राशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)