बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा भाजपचा प्रयत्न जनतेने झिडकारला - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:24 PM2022-04-11T12:24:13+5:302022-04-11T12:24:57+5:30
आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही.. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेला त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते?
कोल्हापूर : विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली होती. तशी छुपी युती आम्ही करत नाही. शिवसेना समोरून वार करते, पाठीत वार करणारी आमची औलाद नाही. हिंदुत्वाचे पेटंट एकट्या भाजपनेच घेतले आहे का, अशी रोखठोक विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. भाजपने नकली भगव्याचा बुरखा पांघरला असून, तो या निवडणुकीत फाटल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे यांनी बजावले.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संबोधित केले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही.. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेला त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते? भाजपने देशात बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने तो झिडकारून लावला. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाजपला एवढेच प्रेम होते तर त्यांच्या खोलीत दिलेला शब्द अमित शहा यांनी का पाळला नाही. भाजपला अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांनीच भगवी दिशा दाखवली; परंतु त्यांचा आता भाजपला विसर पडला आहे.
ग्रामपंचायतपासूनच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहतो, ते पंतप्रधान आहेत की सरपंच हेच कळत नाही. काल देेवेंद्र फडणवीस कोल्हापूरला येऊन गेले, विकासावर बोलण्यासारखे काहीच नसल्याने त्यांनी धार्मिक मुद्द्यावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाचे पेटंट केवळ भाजपने घेतले आहे का? आतापर्यंत जनसंघ, जनता पक्ष मग भाजप असे किती रंग बदलले. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला भगवी दिशा दाखवली याचा विसर पडला आहे. सीमा भागातील मराठी माणसावर अत्याचार होत असताना तुमची तोंडे का बंद होती? तेथील शिवरायांचा भगवा उतरवला, त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे गेले होते..?
कोल्हापूर बालेकिल्ला..
कोल्हापूर भगव्याचा बालेकिल्ला आजही आहे आणि उद्याही राहील. मर्दासारखे कसे लढावे, हे कोल्हापूरकरांकडून शिकावे. कोल्हापूर हिंदुत्वाचा ठसा पुसू देणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.
भाजप खोटे बोलण्यात पटाईत
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार उत्तम चाललेले आहे, जनतेच्या विकासाचे अनेक निर्णय आम्ही घेत आहोत, फक्त आम्ही खोटे बोलत नाही, येथेच कमी पडत आहोत. कमी पडलो तरी चालेल; पण खोटे बोलणार नाही. खोटे बोल, पण रेटून बोल ही भाजपची सवय आहे.