जनतेनेच जनता कर्फ्यूला नाकारले, बंद दुकानेही झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:57 PM2020-09-12T17:57:14+5:302020-09-12T17:59:21+5:30
कोल्हापूर शहरात शनिवारी बहुतांश दुकाने सुरू होती. जनतेनेच जनता कर्फ्यूला नाकारल्याचे यामुळे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे शुक्रवारी जी काही दुकाने बंद होती, त्यांपैकी बहुतांश व्यावसायिकांनी शनिवारी दुकाने सुरू केली.
कोल्हापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. परंतु फेरीवाले, व्यापारी, भाजी विक्रेते यांच्यासह नागरिकांनीही याचे पालन केले नाही. शनिवारी शहरात बहुतांश दुकाने सुरू होती. नागरिकही खरेदीसाठी मोठ्या संख्येने रस्त्यांवर होते. जनतेनेच जनता कर्फ्यूला नाकारल्याचे यामुळे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे शुक्रवारी जी काही दुकाने बंद होती, त्यांपैकी बहुतांश व्यावसायिकांनी शनिवारी दुकाने सुरू केली.
शहरात कोरोनचे रोज २५० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून रुग्णसंख्या १० हजारांवर झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे यांनी ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
यानंतर महापौर निलोफर आजरेकर यांनी १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जनता कर्फ्यूचे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पालन करावे, अशी विनंती केली होती. काही दुकाने वगळता याचे पालन कोणीही केले नसल्याचे शनिवारी दिसून आले.
लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजार दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद होता. शिवाजी चौक ते पापाची तिकटी मार्गावरील चप्पल लाईन शुक्रवारी कडकडीत बंद होती. मात्र, शनिवारी येथील १० ते १५ दुकाने सुरू होती. शिवाजी पेठेमध्ये दुसऱ्या दिवशी नागरिकांची वर्दळ कायम होती. उभा मारुती चौक, साकोली कॉर्नर, निवृत्त चौक, तटाकडील तालीम येथील दुकाने सुरू होती.
भाजी मंडई सुरू
कपिलतीर्थ मार्केट, शाहू उद्यान मार्केटमधील विक्रेत्यांनी जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होत शुक्रवारी (दि. ११) व्यवसाय बंद केले होते. यामुळे भाजी मंडईमध्ये शुकशकाट होता. शनिवारी मात्र, पूर्वीप्रमाणेच मंडया सुरू झाल्या. खरेदीसाठी काही लोकांची वर्दळ होती.