मारेकरी शोधण्यासाठी जनआंदोलन उभारणार
By admin | Published: February 21, 2017 03:54 AM2017-02-21T03:54:26+5:302017-02-21T03:54:26+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी शोधण्यात अजून यश आले नाही
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचे मारेकरी शोधण्यात अजून यश आले नाही याची महाराष्ट्र आणि कर्नाटक शासनाला लाज वाटली पाहिजे. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी आम्ही दबाव वाढविणार आहोत. यासाठी देशभरातील लेखकांच्या माध्यमातून जनआंदोलन उभारणार आहे, असे मध्यप्रदेश प्रगतीशील लेखक संघाचे प्रादेशिक महासचिव विनीत तिवारी व अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृती जागर सभेनिमित्त मध्यप्रदेशमधील ११ लेखक, कवी कोल्हापुरात आले होते. यावेळी तिवारी आणि शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
तिवारी म्हणाले, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी या विचारवंतांच्या कर्मभूमीमध्ये जाऊन तेथील संवेदनशील लोकांशी संवाद साधण्यासाठी मध्यप्रदेशमधील लेखकांनी १४ फेब्रुवारीपासून पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेतून सहादिवसीय संवाद यात्रा सुरू केली. सातारा येथे डॉ. दाभोलकर कुटुंबीय व अंनिसचे कार्यकर्ते, गोवामध्ये लेखक, स्थानिक लोक आणि धारवाड येथे प्रा. कलबुर्गी कुटुंबीय, काही कन्नड भाषिक लेखक, साहित्यकार डॉ. गणेश देवी, जनआंदोलनकारी एस. आर. हिरेमठ यांच्याशी संवाद साधून सोमवारी कोल्हापुरात कॉ. पानसरे स्मृतिजागर सभेत समारोप करण्यात आला.
विवेकपूर्ण समाजाची रचना करण्याची गरज असून, त्यादृष्टीने आम्ही लेखक, कवी योगदान देत आहोत, असे राजेंद्र शर्मा यांनी सांगितले. पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन ४२ महिने होऊनही अद्याप तपास लागला नाही, याबाबत संताप व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी महर्षी वि. रा. शिंदे पुलावर जाऊन सोमवारी निषेध आंदोलन केले. (प्रतिनिधी)
‘मॉर्निंग वॉक’ करून राज्य सरकारचा निषेध
गोळ्या घाला, लाठ्या मारा, विचार नाही मरणार...असा विश्र्वास जागवत सोमवारी सकाळी कोल्हापूरातील प्रमुख मार्गांवरून पुरोगामी कार्यकर्त्यांनी पानसरे-दाभोलकर-कलबुर्गी यांच्या विचारांचा जागर केला. सम्राटनगर येथील पानसरे यांच्या निवासस्थानापासून या मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली.