‘कागल’ला भाकरी परतण्याचा जनतेचाच निर्णय --समरजित घाटगे --रोखठोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:39 AM2019-10-16T00:39:48+5:302019-10-16T00:40:38+5:30

या निवडणुकीत जनता पाठीशी असल्याचे सांगून समरजित म्हणाले, ‘गोकुळचे संचालक रणजित पाटील, डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याशिवाय तालुक्यातील सर्व गट माझ्या विरुद्ध आहेत. फार नेतेमंडळी माझ्यासोबत नाहीत.

People's decision to return bread to 'Kagal' - Samrajit Ghatge - Rakhok | ‘कागल’ला भाकरी परतण्याचा जनतेचाच निर्णय --समरजित घाटगे --रोखठोक

‘कागल’ला भाकरी परतण्याचा जनतेचाच निर्णय --समरजित घाटगे --रोखठोक

googlenewsNext
ठळक मुद्देसमरजित घाटगे : माझा विजय निश्चित, लढत दुरंगीच, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा मला आशीर्वाद !

विश्वास पाटील ।

कोल्हापूर : ‘पारंपरिक राजकारणाला कागलची जनता कंटाळली आहे. विद्यमान आमदार ही माझी शेवटची निवडणूक आहे असे सांगत आहेत, म्हणजे पुढची पाच वर्षे ते काहीच काम करणार नाहीत हे स्पष्टच आहे. मी जनतेसमोर ठेवलेला विकासाचा अजेंडा मतदारसंघाच्या सर्वांगसुंदर विकासाचे बोलके उदाहरण आहे. या निवडणुकीत माझ्याविरोधात चेहरे वेगवेगळे असले तरी त्यांची प्रवृत्ती एकच आहे. त्यातही त्यांच्यात नुरा कुस्ती सुरू असल्याचे जनतेनेही ओळखले आहे. त्यामुळे कुणाला मते दिल्यास ती कुजणार हे मतदारांनाही चांगले माहीत आहे. म्हणून लोक माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास समरजित घाटगे यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, गेली तीन वर्षे मी भाजपचे काम केले. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी या कामात मला प्रचंड पाठबळ दिले. त्यामुळेच अनेक प्रश्न मी सोडवू शकलो. जागावाटपामध्ये भाजपची उमेदवारी मिळाली नाही. चांगले काम करूनही माझ्यावर अन्याय झाला, अशी भावना सामान्य जनतेत आहे. त्यामुळेच जनतेच्या एबी फॉर्मवर मी ही निवडणूक लढवीत असून, गावोगावी मिळत असलेला पाठिंबा पाहता, मी ही लढत शंभर टक्के जिंकणार याचा विश्वास आहे.’

या निवडणुकीत जनता पाठीशी असल्याचे सांगून समरजित म्हणाले, ‘गोकुळचे संचालक रणजित पाटील, डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याशिवाय तालुक्यातील सर्व गट माझ्या विरुद्ध आहेत. फार नेतेमंडळी माझ्यासोबत नाहीत. ज्यांनी विक्रमसिंह घाटगे यांच्यामुळे किंवा राजे गटामुळे अनेक पदे भोगली, तीच सर्व मंडळी विरोधात आहेत. त्यातून शाहू घराण्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी राजकारणात येऊच नये, आलो तर टिकूच नये, अन्यथा आपली दुकानदारी बंद होऊ शकते, या पछाडलेल्या मानसिकतेतून मला विरोध होत आहे; परंतु त्याला मी घाबरत नाही. या सत्याच्या लढाईत जनता हाच सर्वांत मोठा नेता माझ्यामागे आहे. त्याच बळावर मी जिंकण्याचा दावा केला आहे.’

सत्तेतून पैसा व पैशातून पुन्हा सत्ता हे चक्र या निवडणुकीत रोखण्याचा निर्धार जनतेनेच केला आहे. विकासाचा स्वच्छ दृष्टिकोन व श्वेतपत्रिका घेऊनच मी लोकांसमोर जात आहे. गटातटाच्या राजकारणात अडकलेल्या जनतेला मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचे स्वप्न मी दाखविले आहे. कागलला ‘राजकारणाचे विद्यापीठ’ असे कुचेष्टेने म्हटले जाते; परंतु कागलसह गडहिंग्लज व उत्तूरचा परिसर विकासाचे मॉडेल व्हावे असेच माझे प्रयत्न आहेत. नुसती टीकाटिप्पणी, राजकीय राळ उडवण्यात मला रस नाही. कुणी काय केले हे सांगण्यापेक्षा मी काय करणार आहे, हे सांगण्यावर माझा भर आहे, असे समरजित घाटगे यांनी सांगितले.

कागल विधानसभा मतदारसंघात लढत दुरंगीच होत असून, या मतदारसंघातील कागलसह गडहिंग्लज, उत्तूर परिसरातील जनतेने या वेळेला भाकरी परतण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझा विजय नक्की झाला असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा माझ्या उमेदवारीस आशीर्वाद आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजकारणातील पुढील वाटचाल करणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत आवर्जून सांगितले.




विकास संकल्प

  • आरोग्य : मतदारसंघात डायलेसिस सेंटर सुरू करणार. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करणार. कागलचे आरोग्य केंद्र स्टाफ, औषधे, उपचार अशा सर्वच स्तरांवर सक्षम करण्याचा प्रयत्न.
  • शिक्षण : लोकसेवा परीक्षेचे कोचिंग सेंटर तिन्ही नगरपालिकांच्या शहरामध्ये सुरू करणार. कागल हे एज्युकेशन हब व्हावे, असा प्रयत्न आहे.
  • जलसमृद्धी : आरळगुंडी येथे आणखी तीन बंधारे बांधणार. त्यामुळे कितीही कमी पाऊस पडला तरी चिकोत्रा धरण भरू शकेल.
  • नोकरी : गडहिंग्लज औद्योगिक वसाहत विकसित करणार. राजे बँक व अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत कर्जपुरवठा करून व्यवसाय सुरू करण्यास बळ देणार.
  • महिलांचे सबलीकरण : महिला बझार सुरू करणार. बचत गटाच्या महिलांना आॅनलाईन पोर्टलद्वारे आॅर्डर्स मिळवून देणार.

 

जेव्हा माणसाला पराभव दिसू लागतो तेव्हाच त्याच्याकडून सर्व मार्ग संपले म्हणून दहशत दाखविली जाते. आमच्या आईसाहेबांना फोनवरून धमकी देण्याचा प्रकारही त्यातलाच आहे. त्यांना जनताच २१ तारखेला मतदान यंत्रातून उत्तर देईल.

Web Title: People's decision to return bread to 'Kagal' - Samrajit Ghatge - Rakhok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.