कुरुंदवाडमध्ये लोकप्रतिनिधींना आत्मचिंतनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:24 AM2021-04-06T04:24:27+5:302021-04-06T04:24:27+5:30
गणपती कोळी कुरुंदवाड : गेल्या चार वर्षांत राजकीय कुरघोडीतून शहराच्या विकासाला खो बसला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींबाबत शहरवासीयांमध्ये नाराजी असतानाच, ...
गणपती कोळी
कुरुंदवाड : गेल्या चार वर्षांत राजकीय कुरघोडीतून शहराच्या विकासाला खो बसला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींबाबत शहरवासीयांमध्ये नाराजी असतानाच, कोरोना प्रतिबंधक लसीवरून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लोकप्रतिनिधींना, निवडणुकीत मतांसाठी उंबरठे झिजविता, तसे लसीकरणासाठी झिजवा. तुम्हाला आशीर्वाद मिळेल, असा उपहासात्मक सल्ला देऊन लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यावर शंका व्यक्त केली आहे. शहाण्याला शब्दांचा मार या उक्तीप्रमाणे जनतेचे सेवक समजले जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ४५ वयोगटावरील व्यक्तींसाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे सक्तीचे केले आहे. असे असताना शहरात केवळ १३ टक्के लोकांनीच लस टोचून घेतली आहे. वास्तविक लोकप्रतिनिधींनी लोकांना आपल्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण घेण्यासाठी प्रबोधन आणि प्रवृत्त करणे गरजेचे आहे. मात्र याबाबत ना नागरिक ना नगरसेवक दक्ष आहेत.
कोविड लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांनी शनिवारी पालिकेत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी शहरात केवळ १३ टक्केच लोकांनी लस घेतल्याने जिल्हाधिकारी देसाई यांनी आश्चर्य व्यक्त केले. या गंभीर साथीबाबत उदासीनता का?, असा प्रश्न उपस्थित करून लोकप्रतिनिधींवरच रोष व्यक्त केला. निवडणुकीत मतांसाठी प्रत्येक मतदाराचे उंबरठे झिजविता, तसे या गंभीर साथीबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून लस घेण्यासाठी प्रवृत्त करा, तुम्हाला आशीर्वाद मिळेल, असा सल्ला देत चिमटा घेतला. त्यामुळे लोकप्रतिनिधिंनी या उपहासात्मक सल्ल्यातून बोध घेण्यासाठी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.