निर्बंधांच्या शिथिलतेसाठी लोकप्रतिनिधींनी लसीकरण मोहिम राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:35 AM2021-07-19T11:35:19+5:302021-07-19T11:37:52+5:30
गडहिंग्लज : लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाऊनची बंधने शिथिल करता येतील. त्यामुळे निर्बंधांच्या शिथिलतेसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती , ...
गडहिंग्लज : लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाऊनची बंधने शिथिल करता येतील. त्यामुळे निर्बंधांच्या शिथिलतेसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी मोफत लसीकरण मोहिम हाती घ्यावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी केले.
गडहिंग्लज विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.येथील पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक झाली.
मुश्रीफ म्हणाले, निर्बंध शिथिल करण्यासाठी सर्वत्र किमान ७० टक्के लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. खाजगी संस्था, बँका, आस्थापनांनीदेखील आपल्या संस्थेतील कर्मचार्यांना मोफत लस उपलब्ध करुन द्यावी. त्यामुळे शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
गडहिंग्लज, आजरा आणि चंदगडमधील शासकीय रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. अॉक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली असून अन्य आरोग्य सुविधादेखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत.त्यामुळे तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आपण आहोत असा विश्वासही मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीस गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसिलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप आंबोळे, डॉ.चंद्रकांत खोत, माजी जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लज बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई उपस्थित होते.
गडहिंग्लज कारखानाही चालला पाहिजे !
शेतकरी आणि कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न कारखान्याशी निगडीत असल्यामुळे आजर्याच्या संचालकांनी चांगला निर्णय घेतला. त्याचप्रमाणे गडहिंग्लज कारखानादेखील चालला पाहिजे,अशीच आपली भूमिका आहे. त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करायला तयार आहे,अशी ग्वाही मुश्रीफ यांनी पुन्हा दिली.