राज्यातील लोकप्रतिनिधी कमी पडतात

By admin | Published: April 2, 2016 12:25 AM2016-04-02T00:25:15+5:302016-04-02T00:25:37+5:30

ज्ञानेश्वर मुळे यांची खंत : दोनदिवसीय पासपोर्ट शिबिराचे उद्घाटन

People's representatives in the state fall short | राज्यातील लोकप्रतिनिधी कमी पडतात

राज्यातील लोकप्रतिनिधी कमी पडतात

Next

कोल्हापूर : दिल्लीतून इतर राज्यांतील लोकप्रतिनिधी आपल्या राजकीय बळाचा वापर करून जनतेची कामे करून घेतात; परंतु महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी त्या तुलनेत कमी पडतात, अशी खंत कॉन्सुलर पासपोर्ट, व्हिसा विभागाचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. यावर दिल्ली येथे मराठी नेते व लोकप्रतिनिधींचे लॉबिंग कमी पडते, यात राज्य शासनाने पुढाकार घेऊन सर्वांमध्ये समन्वय ठेवावा, अशी प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयातर्फे आयोजित दोनदिवसीय पासपोर्ट शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते. पहिल्या दिवशी १५० जणांच्या पासपोर्टचे काम करण्याची प्रक्रिया झाली.
मुळे म्हणाले, पासपोर्ट हा व्यक्तीच्या आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम बनला आहे. जग समजून घेणे, व्यवसाय, शिक्षण यासाठी देश-विदेशातील प्रवास महत्त्वाचा आहे. त्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. लोकांना एकमेकांशी जोडणे हे आपले ध्येय आहे. पासपोर्ट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही सक्षम कारणाशिवाय पासपोर्ट नाकारता येत नाही. दरवर्र्षी परदेशातील ७० लाख लोक विविध कारणांनी भारतात येतात; तर भारतातील सुमारे १ कोटी ५० लाख लोक परदेशी जातात. त्यांच्याशी संबंधित पासपोर्ट, व्हिसाविषयक कामांमध्ये हे कार्यालय जनताभिमुख झाले आहे. भारत सरकार पासपोर्ट सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे पासपोर्ट वितरणामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. ते पहिल्या क्रमांकावर यावे, अशी अपेक्षा आहे.
खा. शेट्टी म्हणाले, कोल्हापूरला पासपोर्ट कार्यालय व्हावे. ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या गुन्ह्यांचे स्वरूप पाहून पासपोर्ट दिले जावेत.
यावेळी खा. महाडिक व अतुल गोतसुर्वे यांचे भाषण झाले. पासपोर्ट कार्यालयाचे प्रोटोकॉल इन्चार्ज जतिन आर. पोटे यांनी स्वागत केले. गोतसुर्वे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


मराठी लोकप्रतिनिधींच्या लॉबिंगची गरज
दिल्लीत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचे बळ कमी पडते, या ज्ञानेश्वर मुळे यांच्या वक्तव्यावर खासदार शेट्टी म्हणाले, दिल्लीत मराठी नेते, अधिकाऱ्यांचे लॉबिंग कमी पडते, हे मुळे यांना सांगावयाचे होते. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन मराठी नेते व अधिकाऱ्यांचा समन्वय ठेवून महाराष्ट्र सदनाचा विकासाभिमुख कामांसाठी उपयोग करावा.

Web Title: People's representatives in the state fall short

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.