लोकांची सेवा, हक्कांसाठी सदैव कार्यरत :अमल महाडिक --रोखठोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:03 AM2019-10-18T01:03:58+5:302019-10-18T01:05:51+5:30

संतोष मिठारी । कोल्हापूर : माझ्यावर विश्वास ठेवून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जनतेने गेल्या निवडणुकीत मला भाजपच्या माध्यमातून एक सेवक ...

 People's service, always working for the rights: Amal Mahadik | लोकांची सेवा, हक्कांसाठी सदैव कार्यरत :अमल महाडिक --रोखठोक

लोकांची सेवा, हक्कांसाठी सदैव कार्यरत :अमल महाडिक --रोखठोक

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ यानुसार भाजप सरकारचे काम

संतोष मिठारी ।
कोल्हापूर : माझ्यावर विश्वास ठेवून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जनतेने गेल्या निवडणुकीत मला भाजपच्या माध्यमातून एक सेवक म्हणून निवडून दिले. मतदारसंघात विविध स्वरूपांतील ११५० कोटींची कामे केली आहेत. त्यात पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, सीपीआर रुग्णालयाचे सक्षमीकरण, पथदिवे बदलणे, विविध पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे. कोल्हापूर हे विमानसेवेच्या माध्यमातून तिरूपती, बंगलोर, हैदराबाद, मुंबईशी जोडले आहे. विस्तारीकरणाचे काम सुरू असून लवकरच येथे नाइट लँडिंग सुविधा उपलब्ध होईल. केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजना थेटपणे जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत. अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. मी केलेली विकासकामे जनतेसमोर आहेत. त्यामुळे जनता मला निश्चितपणे निवडून देईल, असे आमदार महाडिक यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, मला अजून विकासकामे करावयाची आहेत. सध्या सुरू असलेली आणि अपूर्ण असलेली कामे मार्गी लावायची आहेत. त्यात अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करणे, आदींचा समावेश आहे. केंद्र आणि राज्य सरकारने महापालिकेला विविध योजनांसाठी निधी दिला असून जे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत, ते मार्गी लावेन. जि.प.च्या शाळांना अद्ययावत सुविधांसह सक्षम करणार आहे. ग्रामीण भागातील ओढे-नाले पुनरुज्जीवित करणार आहे. मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या १०० टक्के पूर्ततेसह ठिकठिकाणी झाडे लावून आॅक्सिजन पार्क करणार आहे. खेळाडू, क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक सुविधा पुरविणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ६५० खाटांचे रुग्णालय आणि शेंडा पार्क परिसरात अद्ययावत कॅन्सर निवारण केंद्र उभारेन. शहरी, ग्रामीण भागांतील नागरिकांची दुहेरी करातून सुटका होण्यासाठी शंभर टक्के प्रॉपर्टी कार्ड वाटपासाठी कटिबद्ध आहे.

विकासकामांच्या अनुषंगाने विरोधकांकडून होणाºया टीकेबाबत महाडिक म्हणाले की, मी केलेली विकासकामे जनतेला माहीत आहेत. ज्यांच्याकडे आजपर्यंत सत्ता होती, त्यांनी अपूर्ण ठेवलेली कामे पूर्ण करेन. थेट पाईपलाईनसह अन्य कामांसाठी जो निधी सरकारने दिला आहे, तो माझा किंवा विरोधकांचा नाही, तर नागरिकांचा तो पैसा आहे. त्यामुळे येत्या दीड ते दोन वर्षांमध्ये मी थेट पाईपलाईनचे काम पूर्ण करणार आहे. उद्योजकांचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी मी बांधील आहे. मोठा उद्योग आणण्यासह लघुउद्योगांना सोयीसुविधांसाठी प्रयत्न करेन, सहकार क्षेत्राला बळ देणार आहे. संस्कृत विषयातील पदवी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.


‘आयटी हब’द्वारे रोजगार उपलब्ध होणार
रोजगारनिर्मितीसाठी मी ‘मेक इन कोल्हापूर’ संकल्पना राबविणार आहे. त्याअंतर्गत तरुणाईला विविध कौशल्यांबाबतचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणार आहे. कोल्हापुरात आयटी हब व्हावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत होतो. त्याला यश आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरात मोठा आयटी पार्क उभारण्याची घोषणा सभेत केली. त्या माध्यमातून कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

 

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या दृष्टिकोनातून माझे सरकार काम करीत आहे. या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून मी कार्यरत आहे. विकासाचे व्हिजन घेऊन ‘कोल्हापूर दक्षिण’मधील जनतेपर्यंत जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने विश्वासाने सत्ता दिली. त्याला तडा जाऊ देणार नाही. विकासकामांबरोबर लोकांची सेवा, त्यांच्या हक्कासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता कार्यरत राहणार आहे, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये दिली. विरोधक काय टीका करतात त्याकडे लक्ष देत नाही. आरोप अथवा टीका करणे ही माझी संस्कृती नाही. विरोधकांना जनताच उत्तर देईल, असेही आमदार महाडिक यांनी सांगितले.


सर्वांना विश्वासात घेऊन प्रगती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सर्व घटकपक्षांना बरोबर आणि विश्वासात घेऊन आम्ही राज्याची प्रगती करत आहोत. माझ्या सरकारने शेतकऱ्यांसह अन्य घटकांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये शेतकºयांची कर्जमाफी, ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन वाढविली. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ६०० कोटींची मदत, आदींचा समावेश आहे. माझे सरकार लोकांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे, असे आमदार महाडिक यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांत मी लोकांचा विश्वास जपत काम केले आहे. त्याच पद्धतीने यापुढेही अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, जगभरात महाराष्ट्राची ओळख करून देण्यासाठी सर्वांनी मला साथ देऊन भाजप-शिवसेना महायुतीचे हात बळकट करावेत.
- अमल महाडिक

Web Title:  People's service, always working for the rights: Amal Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.