‘टक्केवारी’वरून खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:30 AM2018-05-15T00:30:42+5:302018-05-15T00:30:42+5:30
कोल्हापूर : शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना राज्य सरकारने मंजूर केलेली १०७ कोटींची ‘अमृत योजना’ शासकीय अधिकाऱ्यांनी टक्केवारीत अडकविली असल्याचा गंभीर आरोप भूपाल शेटे यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. त्यामुळे सभागृहात सत्तारूढ आणि विरोधी सदस्य एकमेकांना भिडले. मात्र, माजी महापौर हसिना फरास यांनी त्यात हस्तक्षेप करीत सर्वांना शांत राहण्याचा सल्ला दिल्याने सभागृहात शांतता निर्माण झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या.
शहरातील पाणीप्रश्नावर चर्चा सुरू होताच भूपाल शेटे यांनी शहरासाठी मंजूर केलेल्या १०७ कोटींच्या ‘अमृत योजने’ला अंतिम मंजुरी न मिळाल्याचा विषय उपस्थित केला. दोन महिने झाले योजनेच्या मंजुरीचे काम रखडले आहे. ही योजना टक्केवारी, लोणी-मलई खाण्यासाठी अधिकाºयांनी रोखली की कोणी मंत्र्यांनी रोखली याचा खुलासा आयुक्तांनी करावा, अशी मागणी शेटे यांनी केली. मंत्र्यांचा उल्लेख करताच भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर यांनी शेटे यांच्या वक्तव्यावर जोरदार हरकत घेत ‘शेटे यांनी शब्द मागे घ्यावेत,’ अशी मागणी लावून धरली. यावेळी शेटे-सूर्यवंशी यांच्यात खडाजंगी झाली. सुनील कदम यांनीही शेटे यांच्या वक्तव्यावर हरकत घेत जनतेला भेडसावणाºया पाण्याच्या प्रश्नावर आरोप-प्रत्यारोप करू नयेत, असा सल्ला दिला. विरोधी आघाडीचे राजसिंह शेळके, किरण नकाते, कमलाकर भोपळे यांनी शेटे यांना जोरदारपणे विरोध केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. शेवटी सभागृहातील ज्येष्ठ सदस्या हसिना फरास यांनी शेटे यांना समजावत ‘तुम्ही आरोप करणार असाल, भांडत बसणार असाल, तर प्रशासनाला तेवढेच पाहिजे आहे. आपल्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न करू नका,’ असे आवाहन केले, त्यामुळे गोंधळ शांत झाला.
पुन्हा दूषित पाण्याच्या बाटल्या सभागृहात
दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी दिलीप पोवार, वहिदा सौदागर यांनी केल्या. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी बाटल्यांतून पाणी आणले होते. सौदागर यांनी गेल्या दोन वर्षांपासून आपल्या भागात अळ्यामिश्रित पाणी येत असल्याचे सांगितले; तर पोवार यांनी सभागृहात जल अभियंता कुलकर्णी यांनी दूषित पाणी पिण्याचा आग्रह धरला. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह अन्य सदस्यांनी त्यांना रोखले.
मंजुरी येताच कामे सुरू करू : आयुक्त
राज्य सरकारच्या उच्चस्तरीय तांत्रिक समितीकडून अमृत योजनेला अंतिम मंजुरी मिळताच पुढील आठवड्याच्या आत ठेकेदारास वर्क आॅर्डर देऊन कामे सुरू केली जातील. तसेच गळती काढण्याची ६० लाखांची कामे निविदा प्रक्रियेत आहेत, तीही लगेच सुरू केली जातील. दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याच्या आता तक्रारी येत आहेत, त्याही दूर केल्या जातील. ज्या सदस्यांच्या भागात तक्रारी आहेत, त्यांनी त्या लेखी द्याव्यात. त्या नक्कीच सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आयुक्तांनी सांगितले.
अतिरेक होण्याची वाट पाहू नका
नगरसेवक खुळे आहेत म्हणून ते येथे येऊन तक्रार करीत नाहीत. नागरिक त्यांच्या दारात सकाळी सहा वाजता येतात. अधिकारी नीट जबाबदारी पार पाडत नाहीत म्हणून आम्हाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता आमच्याकडून अतिरेक होऊ देऊ नका, असा इशारा पूजा नाईकनवरे यांनी दिला.
अधिकाºयांनी गांभीर्याने घेऊन कामे करावीत; अन्यथा एक दिवस आम्हाला दणका द्यावा लागेल, असाही इशारा त्यांनी दिला. ‘साहेब, तुमच्या पुढ्यात बोंब मारली; पण काहीच उपयोग झाला नाही. तुम्ही काम करण्यास सक्षम आहात की नाहीत?’ असा संतप्त सवाल विलास वास्कर यांनी विचारला.