शेवग्याचा पाला, कडधान्यापासून पौष्टिक नूडल्स

By admin | Published: July 24, 2016 12:50 AM2016-07-24T00:50:41+5:302016-07-24T00:57:53+5:30

शिवाजी विद्यापीठातील संशोधन : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाला प्रस्ताव सादर

Perennial beans, pulses, nutritious noodles | शेवग्याचा पाला, कडधान्यापासून पौष्टिक नूडल्स

शेवग्याचा पाला, कडधान्यापासून पौष्टिक नूडल्स

Next

संतोष मिठारी -- कोल्हापूर --नोकरी, व्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांतील वाढत्या स्पर्धेमुळे सध्याचे जीवन धावपळीचे बनले आहे. त्यातून आहारातही फास्ट फूड आले असून, ते जीवनशैलीचा भागच बनले आहे. या फास्ट फूडला पौष्टिकतेची जोड देण्याचे काम शिवाजी विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठातील फूड सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी (अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान) विभागाने चार वर्षांच्या संशोधनातून तृणधान्ये, कडधान्ये व पालेभाज्यांपासून पौष्टिक नूडल्सची निर्मिती केली आहे.
फास्ट फूडमध्ये बहुतांश जणांच्या आवडीचा पदार्थ नूडल्स आहे. हे लक्षात घेऊन फूड सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजीचे समन्वयक डॉ. अक्षयकुमार साहू व संशोधक विद्यार्थी अभिजित गाताडे यांनी फास्टफूडमध्ये पौष्टिकता देण्यासाठी या नूडल्सचे संशोधन करण्याचे ठरविले. त्याचा प्राथमिक आराखडा करून त्यांनी सन २०११ मध्ये नवी दिल्लीतील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाला संशोधनाचा प्रस्ताव सादर केला. मंत्रालयाने त्याला दुसऱ्या वर्षी मंजुरी देऊन ३१ लाख १३ हजार रुपयांचा निधी दिला. यानंतर गेल्या चार वर्षांत डॉ. साहू व संशोधक विद्यार्थी गाताडे यांनी संशोधन करून तृणधान्य गहू, कडधान्य सोयाबीन, हरभरा आणि शेवगा व हरभऱ्याचा पाला, पालक यांच्या एकत्रीकरणातून पौष्टिक नूडल्सची निर्मिती केली. सन २०१४ मध्ये त्याची पुण्यातील एपीटी रिसर्च फौंडेशनमध्ये चाचणी केली. यातून आरोग्याच्या दृष्टीने असलेली त्याची उपयुक्तता जाणून घेतली. या नूडल्सच्या निर्मितीचे तंत्रज्ञान हे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या मान्यतेनुसार महिला बचतगट आणि उद्योजकांना देण्याची तयारी विद्यापीठाने केली आहे.
सर्व वयोगटांसाठी
समतोल आहार
फास्ट फूडच्या जमान्यात पौष्टिकता जपण्याच्या उद्देशाने पौष्टिक नूडल्सची निर्मिती केली असल्याचे डॉ. अक्षयकुमार साहू यांनी सांगितले.
ते म्हणाले, या नूडल्समध्ये मैद्याचा वापर कमी प्रमाणात, तर तृणधान्य, कडधान्य व पालेभाज्या यांचा वापर अधिक केल्याने सर्व वयोगटातील लोकांना त्याद्वारे एक समतोल आहार मिळणार आहे. शिवाय ज्या महिला व मुले-मुलींमध्ये आयर्न, कॅल्शिअमची कमतरता आहे, त्यांच्यासाठी तो पोषक आहार म्हणून उपयुक्त ठरणार आहे. शेवगा व हरभऱ्याचा पाला अधिकतर वेळा वाया जातो; पण या नूडल्समध्ये त्याचा वापर केल्याने शेतकऱ्यांना त्याच्या विक्रीतून अर्थार्जन करता येणार आहे.


आरोग्यदृष्टीने महत्त्व
या पौष्टिक नूडल्सचा रंग हिरवा आहे. नूडल्स् खाल्याने रक्तामधील आयर्न, कॅल्शिअम, हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शिवाय कोलेस्टेरॉल कमी होऊन वजन आटोक्यात राहते. कडधान्यांच्या वापरामुळे नूडल्समधील प्रथिनांचे प्रमाण व गुणवत्ताही वाढविलेली आहे. पालेभाज्यांच्या वापरामुळे आयर्न, कॅल्शिअम आणि तंतुमय पदार्थ यांचे प्रमाण वाढलेले आहे. या नूडल्स पचण्यास हलक्या असल्याचे संशोधक विद्यार्थी अभिजित गाताडे याने सांगितले.

Web Title: Perennial beans, pulses, nutritious noodles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.