समाजाच्या मानसिकतेवर अचूक बोट
By admin | Published: December 17, 2015 01:35 AM2015-12-17T01:35:10+5:302015-12-17T01:39:51+5:30
राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप : प्रेक्षकांची खचाखच गर्दी; ‘काही क्षण‘ने सूप वाजले
कोल्हापूर : बालनाट्य स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी चिमुरड्यांनी विविध बालनाट्यांतून सामाजिक संदेश दिले. शेवटच्या दिवशीही प्रेक्षकांनी गर्दी केली होती. दामले विद्यालय, रत्नागिरीतर्फे सादर झालेल्या ‘काही क्षण’ या नाटकाने १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
‘झाडवाली झुंबी’ या नाटकाने बुधवारी, चौथ्या दिवसाची सुरुवात झाली. शिंदे अकॅडमी, कोल्हापूर यांनी सादर केलेल्या या नाटकामध्ये, निसर्गरक्षण व पर्यावरण रक्षण या विषयाची मांडणी करीत निसर्ग आणि मानव यांच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकला. ‘प्लॉट नंबर शून्य कचराकुंडीजवळ,’ अक्षरसिंधू साहित्य कलामंच, कणकवली या संस्थेने नाटकाच्या माध्यमातून समाजातील अनाथ मुलांची परिस्थिती व समाजाचा दृष्टिकोन मुलांनी मांडला.
‘रानपाखरं’ या अण्णा भाऊ इंग्लिश स्कूल, आजरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकाच्या माध्यमातून शिक्षणासोबतच मूल्यशिक्षणही आजच्या काळात किती गरजेचे आहे, ते पटवून देण्याचा प्रयत्न केला.
आनंदसागर पब्लिक स्कू ल, तासगावने सादर केलेल्या ‘तिसरी घंटा’ या नाटकाच्या माध्यमातून, नाटकांकडे प्रेक्षकांचा ओढा कमी झाल्याने बंद पडलेल्या थिएटरच्या वाट्याला आलेल्या उपेक्षेचे आणि त्याला आलेल्या एकाकीपणावर भाष्य केले. आजरा हायस्कूल, आजराच्या मुलांनी सादर केलेल्या ‘मनू माझा भावला’ या नाटकातून ग्रामीण-शहरी मानसिकतेमधील फरकांमुळे खेड्यातील मुलांना होणारा त्रास मांडला आहे.
आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव या शाळेच्या मुलांच्या ‘केल्याने होत आहे रे’ या वगनाटकाच्या माध्यमातून मुलांच्या मनात असलेली अभ्यासाची भीती कमी करून हसत-खेळत शिक्षणाचा मूलमंत्र दिला. दामले विद्यालय, रत्नागिरीच्या मुलांनी सादर केलेल्याा ‘काही क्षण’ या नाटकाच्या माध्यमातून अनाथ मुले परिस्थितीशी झगडत कशी उभी राहतात, दु:खाच्या क्षणांतही आनंदाचे ‘काही क्षण’ मिळवून जगण्याचा अविरत संघर्ष कशी करतात, याचे दर्शन घडते.