पेरीडच्या महिलेची ‘पीएफ’साठी फरफट थांबणार, ‘लोकमत हेल्पलाईन’चा आधार : ‘महावितरण’कडून आठ दिवसांत पैसे देण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:03 AM2018-02-06T01:03:32+5:302018-02-06T01:03:44+5:30
कोल्हापूर : पेरीड (ता. शाहूवाडी) येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे त्यांच्या पत्नी श्रीमती शालन कुंभार यांना आठ दिवसांत देण्याची व्यवस्था
कोल्हापूर : पेरीड (ता. शाहूवाडी) येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे त्यांच्या पत्नी श्रीमती शालन कुंभार यांना आठ दिवसांत देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे महावितरण कंपनीने सोमवारी स्पष्ट केले. ही रक्कम काही लाखांत आहे.
कुंभार यांचे २ मे २०१४ ला निधन झाले. तेव्हापासून या रकमेसाठी त्या पाठपुरावा करीत आहेत; परंतु त्यांचे पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी ‘लोकमत’ हेल्पलाईनकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार ‘लोकमत’ने महावितरणच्या मुंबई कार्यालयाकडे विचारणा केल्यावर यंत्रणा खडबडून जागी झाली व काही त्रुटींमुळे ही रक्कम त्यांना मिळाली नव्हती ती आम्ही आठ दिवसांत देऊ, असे आश्वासन महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिले.
वासुदेव कुंभार हे महावितरणमध्ये तंत्रज्ञ होते. त्यांचा २०१४ मध्ये पिशवी येथे अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर श्रीमती कुंभार यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना आजतागायत भविष्य निर्वाह निधीची रक्कम व पेन्शनही मंजूर झालेली नाही. हे पैसे मिळावेत म्हणून कुंभार यांनी कोल्हापुरातील आर-१ विभागीय कार्यालयात वारंवार कर्मचारी व अधिकाºयांची भेट घेतली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. देतो, करतो अशी आश्वासने त्या गेली चार वर्षे ऐकत आहेत.
याबाबत श्रीमती कुंभार म्हणाल्या, आर-१ विभागात काम करणाºया श्रीमती बनगे, श्रीमती भोसले व माणगांवकर या आम्ही या विभागात अजून नवीन आहे, माहिती घेतो असे सांगत असत. त्याचा मला चार वर्षे खूप त्रास झाला आहे. माझ्या पतीने कंपनीसाठी प्राणत्याग केला आहे त्याचा कंपनीस विसर पडला आहे. तब्बल आठवेळा मला कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.
तेवढ्यावेळा मी ती पूर्तता केली तरी अजूनही जर महावितरण कागदपत्रांत त्रुटी आहेत असे म्हणत असेल तर ही बाब निंदनीय आहे. माझी आता हेलपाटे मारण्याची आर्थिक स्थिती नाही. मला दवाखान्यात उपचार करण्यासाठीही पैसे नाहीत तरीही महावितरणला माझी दया येत नाही. हे सर्व जाणिवपूर्वक केले जात असल्याचा संशय आहे. म्हणूनच मी ‘लोकमत’कडे दाद मागितली आहे. काही कामचुकार कर्मचाºयांमुळे महावितरणची बदनामी होत असून, माझ्यासारख्या आणि किती कर्मचाºयांची प्रकरणे रखडली आहेत याचीही कंपनीने चौकशी करावी.
आठ वेळा प्रस्ताव मागे
कुंभार यांचा भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव कोल्हापूर विभागाने (आर-१) तपासूनच मग तो महावितरणच्या मुंबईतील बांद्रा कार्यालयाकडे पाठविला. परंतु, हा प्रस्ताव एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल आठवेळा त्रुटी काढून परत आला. ज्यांनी हा प्रस्ताव तपासला त्यांनी एकदाच या सर्व त्रुटी काढून तो परिपूर्ण प्रस्ताव का पाठविला नाही, अशी विचारणा आता होत आहे. त्यानिमित्ताने कंपनीच्या आंधळ्या कारभारावर प्रकाशझोत पडला आहे. ‘लोकमत’ने सोमवारी मुंबई कार्यालयात चौकशी केल्यावर मग कोल्हापूर कार्यालयातीलही यंत्रणा खडबडून जागी झाली व आम्ही तुमचे पैसे देणार आहोत, वृत्तपत्रांकडे कशाला गेला अशी उलट विचारणा कुटुंबीयांना करण्यात आली.