बांदिवडेकर कुटुंबातील खूनसत्रास पूर्णविराम

By Admin | Published: February 10, 2017 12:40 AM2017-02-10T00:40:23+5:302017-02-10T00:40:23+5:30

सामंजस्याचे पाऊल; नागनवाडी येथील प्रकाश बांदिवडेकरसह दहाजण निर्दोष

Period of extortion in the house of Bhaivedekar | बांदिवडेकर कुटुंबातील खूनसत्रास पूर्णविराम

बांदिवडेकर कुटुंबातील खूनसत्रास पूर्णविराम

googlenewsNext

कोल्हापूर : ‘खुनाचा बदला खून’ या सूडनाट्यातून नागनवाडी (ता. चंदगड) येथे बांदिवडेकर यांच्या कुटुंबामध्ये एकापाठोपाठ एक असे नऊ खून झाले. जिल्हा हादरवून सोडणाऱ्या या सूडनाट्यातील अशोक गोपाळ बांदिवडेकर याच्या खूनप्रकरणाची सुनावणी गुरुवारी कोल्हापुरातील न्यायसंकुलामध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर झाली. या सुनावणीत महत्त्वाचे तेरा साक्षीदार फितूर झाले. त्यामुळे प्रकाश सात्ताप्पा बांदिडवडेकरसह दहा संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. या निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागाचेही लक्ष लागून राहिले होते.
सुडाच्या भावनेने बांदिवडेकर कुटुंबातील दोन्हीही गट चांगलेच भडकल्याने एकापाठोपाठ नऊ जणांचे खून पडले. त्यामुळे दोन्हीही गटांतील भावी पिढीचेही नुकसान होत होते. या कुटुंबात डॉक्टर, इंजिनिअर, वकील, असे अनेक नामवंत सुशिक्षित आहेत. हे रक्तरंजित सूडसत्र कुठेतरी थांबून भविष्यात नव्या पिढीला चांगले दिवस यावेत, या भावनेतून यापूर्वी तत्कालीन कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक माधव सानप यांनी या कुटुंबात सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हे खूनसत्र थांबले असे वाटत असतानाच पुन्हा खुनाची मालिका सुरू राहिली होती; पण बांदिवडेकर खून खटल्यात हे खूनसत्र थांबावे यासाठी काहींनी प्रयत्न केले. त्यामुळे फिर्यादीसह अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले. त्यामुळे आरोपी निर्दोष सुटले आणि आता नव्या पर्वाला प्रारंभ झाला आहे.
या खूनप्रकरणात एकूण १२ संशयितांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यापैकी रामचंद्र साताप्पा बांदिवडेकर (वय ५५) हा संशयित आरोपी अद्याप फरार आहे; तर सुनावणीदरम्यानच, दुसरा संशयित शिवाजी सटुप्पा गावडे-पाटील (४५) याची न्यायालयानेच निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे उर्वरित १० संशयितांवर हा खटला सुरू होता. त्या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात, संशयित आरोपींच्यावतीने अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. निखिल शिराळकर यांच्यासह त्यांचे सहकारी अ‍ॅड. दीपक पाटील, प्रवीण पाटील यांनी काम पाहिले. सरकारतर्फे सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी काम पाहिले.
या खटल्यामध्ये एकूण १८ साक्षीदार तपासले. मृताचा मुलगा फिर्यादी सचिन, मृत अशोकची पत्नी अनिता, पुतण्या रोहन नामदेव बांदिवडेकर, गाडीचालक बाळेश दत्तात्रय औंधकर तसेच सलून दुकानदार व परिसरातील इतर दुकानदार या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी झाल्या; पण हे सर्व साक्षीदार फितूर झाले तर तपासी अंमलदार तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक फुलचंद चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अमित त्रिपुटे, तत्कालीन नायब तहसीलदार रमेश शेंडगे या सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारच्या बाजूने महत्त्वपूर्ण साक्षी दिल्या; पण सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.


यांची झाली निर्दोष मुक्तता
डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर (वय ४७), पुंडलिक साताप्पा बांदिवडेकर (६१), अशोक पुंडलिक गावडे (३१), हेमंत भीमराव पवार (४३), महादेव दत्तू कांबळे (३४), संतोष दत्तात्रय जामुने (२२), सुधीर उल्हास सातपुते (२६), सुभाष संतू नाईक (२६), परशुराम वसंत पाटील (२१) मंजुनाथ परशुराम गवळी (३५, सर्व रा. नागनवाडी, ता. चंदगड) यांचा समावेश आहे. या आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असली तरी रामचंद्र बांदिवडेकर हा फरारी आहे. त्यामुळे त्याच्याबाबत न्यायालयाने निर्णय दिलेला नाही.


खूनसत्र भाऊबंदकीतून
चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथील बांदिवडेकर यांच्या कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शेती आणि प्रतिष्ठेच्या कारणावरून वाद होता. त्यातूनच एकापाठोपाठ एक सुडाने पेटलेले खूनसत्र घडले. त्यामध्ये नऊजणांना जीव गमवावा लागला होता. - वृत्त/हॅलो ६

Web Title: Period of extortion in the house of Bhaivedekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.