पेरीडच्या 'त्या' महिलेच्या खात्यावर प्रलंबित १८ लाख जमा : ‘महावितरण’कडे भविष्य निर्वाह निधी , एका बातमीने सोडविला प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:31 AM2018-02-17T01:31:41+5:302018-02-17T01:32:06+5:30
कोल्हापूर : पेरीड (ता. शाहूवाडी) येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे तब्बल १८ लाख २२ हजार २४८ रुपये त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती शालन कुंभार यांच्या खात्यावर दोन दिवसांपूर्वी जमा झाले.
कोल्हापूर : पेरीड (ता. शाहूवाडी) येथील वासुदेव ठाणू कुंभार यांच्या भविष्य निर्वाह निधीचे तब्बल १८ लाख २२ हजार २४८ रुपये त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती शालन कुंभार यांच्या खात्यावर दोन दिवसांपूर्वी जमा झाले. ही रक्कम मिळावी म्हणून त्या गेली सव्वा चार वर्षे ‘महावितरण’च्या कार्यालयात हेलपाटे मारत होत्या. त्यांनी त्यासंबंधी साधा एक अर्ज ‘लोकमत हेल्पलाईन’ कडे पाठविला व त्याची दखल घेऊन ‘लोकमत’ने हा विषय धसास लावला.
‘महावितरण’ने हे पैसे आठ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही रक्कम एनएफटी करून कुंभार यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.कुंभार यांचा दि. २ मे २०१४ ला कामावर असताना पिशवी येथे अपघाती मृत्यू झाला तेव्हापासून या रकमेसाठी त्या पाठपुरावा करत होत्या. त्यांना भविष्य निर्वाह निधी, पेन्शन व वैद्यकीय बिलांची रक्कम मिळाली नाही. ‘लोकमत’ने त्यासंबंधी ‘महावितरण’च्या कोल्हापूर व मुंबई कार्यालयात विचारणा केल्यावर भविष्य निर्वाह निधीचे पैसे तातडीने देण्यात आले. पेन्शनचे सुमारे दीड लाख रुपये अजून येणेबाकी आहेत.
वीज मंडळाचाच कर्मचारी, त्यातही डांबावर चढले असताना अपघाती मृत्यू होऊनही त्यांचेच जुने सहकारी मात्र या कर्मचाºयाच्या विधवा पत्नीस न्याय द्यायला तयार नव्हते. ‘देतो’, ‘करतो’ अशी आश्वासने त्या गेली चार वर्षे ऐकत होत्या. ‘आम्ही अजून नवीन आहे’, ‘प्रकरणाची माहिती घेतो,’ अशीही कारणे त्यांना दिली जात होती व वरिष्ठ अधिकाºयांना या प्रकरणात लक्ष घालायला वेळ नव्हता. त्यामुळे हे पैसे मिळत नव्हते. तब्बल आठ वेळा श्रीमती कुंभार यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. तेवढ्या वेळा ती पूर्तता केली तरी महावितरण कागदपत्रांत त्रुटी आहेत म्हणून पैसे द्यायला तयार नव्हते; परंतु हे सगळे प्रश्न ‘लोकमत’मधील एका बातमीने सोडविले व त्या असहाय्य महिलेस न्याय मिळाला. मूळचे शाहूवाडी तालुक्यातील पिशवी येथील असलेले ‘महावितरण’चे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून महिलेला न्याय मिळवून दिला.
‘लोकमत’मुळे न्याय मिळाला
मला मणक्याचा त्रास असल्याने नीट चालता येत नाही तरीही बसत-ऊठत मी चार वर्षे हेलपाटे मारले; परंतु ‘लोकमत’ला बातमी आल्यावर मला न्याय मिळाला. ती आली नसती तर मला अजून किती वर्षे त्रास सहन करावा लागला असता देव जाणे, अशी प्रतिक्रिया शालन कुंभार यांनी व्यक्त केली. आता पेन्शन व वैद्यकीय बिलांचे पैसे ‘महावितरण’ने तातडीने द्यावेत. त्यासाठी मी काय पुन्हा त्यांच्या दारात कधीच जाणार नाही, असा त्रागाही त्यांनी व्यक्त केला.