विद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार : कुलगुरू डॉ. शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 06:41 PM2019-08-17T18:41:40+5:302019-08-17T18:43:32+5:30
शिवाजी विद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा आपला मनोदय असून साहित्य, साहाय्य आणि प्रशिक्षण अशा तिहेरी स्वरूपाची भूमिका या केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ बजावेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी दिली.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा आपला मनोदय असून साहित्य, साहाय्य आणि प्रशिक्षण अशा तिहेरी स्वरूपाची भूमिका या केंद्राच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ बजावेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी दिली.
महापूरग्रस्त झालेल्या सांगली आणि कुरुंदवाड येथील महाविद्यालयांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू शिंदे म्हणाले, कोल्हापूर, सांगली परिसरांत आलेल्या अभूतपूर्व महापुरामुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सुमारे दहा महाविद्यालयांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून त्या महाविद्यालयांना मी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करीत आहे. या महाविद्यालयांना विद्यापीठाच्या स्तरावरून नेमकी कशा स्वरूपाची मदत करता येईल, याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी या संदर्भातील विषय व्यवस्थापन परिषदेसमोर मांडण्यात येईल.
सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, मथुबाई गरवारे महाविद्यालय आणि कुरुंदवाड येथील स. का. पाटील महाविद्यालय या चार महाविद्यालयांना त्यांंनी भेटी दिल्या.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड. धैर्यशील पाटील, डॉ. डी. जी. कणसे, डॉ. सी. टी. कारंडे, अधिसभा सदस्य संजय परमणे, विशाल गायकवाड, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. संजय ठिगळे, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, डॉ. बी. व्ही. ताम्हणकर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, एन.एस.एस. व एन.सी.सी.चे समन्वयक उपस्थित होते.
देवानंद शिंदे गहिवरले...
महाविद्यालयांच्या भिंतींवर महापुराच्या दहा-बारा फूट उंचीच्या तांबड्या-करड्या ओलेत्या खुणा... फरशांवर, जमिनीवर मातकट चिखलाचा थर... वर्गखोल्यांतील भिजून मोडलेले बेंच... कार्यालयीन साहित्याचे झालेले प्रचंड नुकसान... प्रयोगशाळांतील साहित्याची झालेली प्रचंड नासधूस... ग्रंथालयांतील कपाटांमध्ये अक्षरश: कुजलेली दुर्मीळ पुस्तकं... परिसरात सर्वत्र भरून राहिलेला कुजट, कुबट वास... अशी काळजाला पिळवटून टाकणारी दृश्ये पाहून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना गहिवरून आले.