अंबाबाई मंदिरात कायमस्वरूपी लखलखाट
By Admin | Published: September 30, 2016 12:33 AM2016-09-30T00:33:59+5:302016-09-30T01:34:59+5:30
दीपमाळा उजळल्या : विद्युतरोषणाईसाठी दोन कोटींची तरतूद
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात आता कायमस्वरूपी लखलखाट असणार आहे. मंदिरावर विविध रंगसंगतीची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यासाठी शासन व देवस्थान समितीच्यावतीने त्यासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी अंबाबाई मंदिर परिसरातील दीपमाळा विविध रंगांच्या प्रकाशझोतांनी उजळून निघाल्या.
साडेतीन शक्तिपीठातील एक देवता असलेल्या अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. मंदिराचा विकास आणि कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी महापालिका व देवस्थान समितीच्यावतीनेही पुढाकार घेऊन नव्या सुधारणा केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी पुढाकार घेऊन अंबाबाई मंदिराला कायमस्वरूपी आकर्षक विद्युत रोषणाईचा विचार समितीच्या बैठकीत मांडला. गतवर्षीच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र, नवरात्रौत्सव तोंडावर असल्याने त्यावेळी हा विचार बदलण्यात आला.
मात्र, काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापुढे आकर्षक विद्युत रोषणाईचा प्रस्ताव मांडला. चंद्रकांतदादा पाटील यांनीही त्याला तातडीने मान्यता दिली. विविध रंगसंगती असलेली आकर्षक विद्युत रोषणाई कायमस्वरूपी ठेवण्यासाठी २ कोटींचा निधी लागणार आहे. त्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी शासनाकडून १ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आणि देवस्थान समितीने १ कोटींची तरतूद केली आहे. येत्या पाच-दहा दिवसांत या विद्युत रोषणाईचे टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही विद्युत रोषणाई पौर्णिमा, शुक्रवार, दसरा, दिवाळीसह वर्षभरातील महत्त्वाच्या सणांना लावण्यात येणार आहे.
मात्र, सध्यातरी ए-वन डेकोरेटर्सकडून मंदिराला विद्युत रोषणाई केली जात आहे. या विद्युत माळा जोडण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू असून
पावसामुळे त्यात वारंवार व्यत्यय येत आहे. मात्र, गुरुवारी मंदिर परिसरातीलदीपमाळा विविध
रंगांच्या प्रकाशझोतांनी उजळून निघाल्या.
वॉकी-टॉकी आणि हँड मेटल डिटेक्टर
देशातील दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रात अंबाबाई मंदिराला अधिकची सुरक्षा देण्यात येत आहे. त्यासाठी देवस्थान समितीच्यावतीने पोलिसांना व देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांना १० हँड मेटल डिटेक्टर व १५ वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत.
तास मुबलक पाणी
देवस्थान समितीच्या मागणीनुसार महापालिकेच्यावतीने अंबाबाई मंदिराला २४ तास पाणी पुरवण्यात येत असून गुरुवारी या पाईपलाईनची जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंदिरात पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही. इंडो काऊंट कंपनीने ५ लाखांचे वॉटर एटीएम मशीन भक्तांच्या सोयीसाठी देणगी स्वरुपात दिले असून त्याचीही जोडणी करण्यात आली. पाच हजार लिटर पाण्याची क्षमता असलेल्या या टाकीचे बटण दाबले की प्युरिफाय झालेले स्वच्छ पाणी भक्तांना मिळणार आहे. याशिवाय मंदिर परिसरात १ हजार लिटरच्या पाच टाक्या बसवल्या आहेत.