रेड झोनमधील बांधकामांना आयुक्तांकडूनच परवानगी
By admin | Published: July 26, 2016 12:29 AM2016-07-26T00:29:45+5:302016-07-26T00:36:35+5:30
नगररचना सहायक संचालक : शिवसेना शिष्टमंडळाला दिले उत्तर
कोल्हापूर : शहरातील रेड झोनमधील बांधकामांबाबत सोमवारी शिवसेनेने महापालिकेचे नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांना धारेवर धरले. रेड झोनमधील बांधकामाबाबत राज्य शासनाकडून कोणतीही नियमावली आली नसल्याने आयुक्तांच्या अधिकारात अशा बांधकामांना परवाना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रेड झोनमधील बांधकामांबाबत राज्य शासनाकडून कोणत्याही सूचना अगर नियमावली आली नसताना कोणत्या अधिकारात बांधकाम व्यावसायिकांना परवानगी दिली? असा जाब विचारत अशा बेजबाबदारपणे परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली तसेच अशा रेड झोनमधील बांधकामांना भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे धोका पोहोचणार नाही, असे लेखी प्रतिज्ञापत्र देण्याची मागणी केली. संबंधित प्रतिज्ञापत्र येत्या चार दिवसांत देण्याचे आश्वासन खोत यांनी शिष्टमंडळास दिले .
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार व शहरप्रमुख शिवाजीराव जाधव व दुर्गेश लिंग्रस यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने सहायक संचालक खोत यांची राजारामपुरी येथील कार्यालयात भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली.
कोल्हापूर शहरात पूर नियंत्रण रेषेमध्ये (रेड झोन) भविष्यात पुराच्या पाण्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. अशा ठिकाणी बांधकाम विकासासाठी परवानगी देऊ नये, अशी अनेक वर्षांपासून कोल्हापुरात मागणी होत आहे; पण कायद्यातील पळवाटा, प्रशासनातील काही अधिकारी व बिल्डर लॉबीची मिलिभगत यामुळे रेड झोन परिसरात सिमेंटचे जंगल उभारले. जनतेच्या जीविताला धोका पोहोचत आहे म्हणून भविष्यात कोणतीही हानी होऊ नये म्हणून खबरदारी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे, असे संजय पवार यांनी नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांना सुनावले.
यावेळी रेड झोनबाबत शासनाकडून कोणतीही नियमावली आली नसून आयुक्तांच्या अधिकारात हे बांधकाम परवाना देण्यात आल्याचा खुलासा धनंजय खोत यांनी केला.
या शिष्टमंडळात रवी चौगुले, अवधूत साळोखे, राजू यादव, रणजित आयरेकर, दिलीप देसाई, तानाजी इंगळे, शशिकांत बिडकर, मंजित माने, शरद चौगुले, नितीन पाथरवट, अजिंक्य बिरंजे, धनाजी यादव, शुभांगी साळोखे, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)