बांदिवडेकरच्या वाढदिवसाला परवानगी नाकारली

By admin | Published: February 18, 2017 12:51 AM2017-02-18T00:51:59+5:302017-02-18T00:51:59+5:30

पोलिसांकडून कारवाई : शहरात ठिकठिकाणी लावलेली पोस्टर्स हटवली

Permission denied on the birthday of Bhahede Dikar | बांदिवडेकरच्या वाढदिवसाला परवानगी नाकारली

बांदिवडेकरच्या वाढदिवसाला परवानगी नाकारली

Next

कोल्हापूर : बांदिवडेकर खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेल्या डॉ. प्रकाश बांदिवडेकर याला वाढदिवस साजरा करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. डॉ. बांदिवडेकर याचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्या निमित्ताने मुस्कान लॉन येथे जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी मुंबई, पुणे, सातारा, कऱ्हाड, बेळगाव व कोल्हापूर येथील राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रांतील व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. त्याची शहरात विविध ठिकाणी लावलेली पोस्टर्स पोलिसांनी हटवली.
‘खुनाचा बदला खून’ या सूडनाट्यातून नागनवाडी (ता. चंदगड) येथे बांदिवडेकर यांच्या कुटुंबामध्ये एकापाठोपाठ एक असे रक्तरंजित नऊ खून झाले. जिल्हा हादरवून सोडणाऱ्या या सूडनाट्यातील अशोक गोपाळ बांदिवडेकर याच्या खून प्रकरणातून डॉ. प्रकाश सात्ताप्पा बांदिवडेकरसह दहा संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. डॉ. बांदिवडेकरच्या वाढदिवसानिमित्त मुस्कान लॉन, मार्केट यार्ड येथे वाढदिवस नियोजन समितीने जय्यत तयारी केली होती. या वाढदिवसासाठी मुंबई, पुणे, सातारा, कऱ्हाड, बेळगावसह कोल्हापुरातील राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रांतील व्यक्ती उपस्थित राहणार होत्या.
वाढदिवसाच्या कार्यक्रमाला परवानगी मिळावी, यासाठी त्याच्यासह मित्रांनी शुक्रवारी दुपारी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांची भेट घेतली.
यावेळी त्याने व सहकारी मित्रांनी कार्यक्रमाला परवानगी द्यावी, यासाठी विनंंती केली; परंतु राणे यांनी ही विनंती झिडकारत डॉ. बांदिवडेकर याला ‘तुला वाढदिवसाचा कार्यक्रम घेता येणार नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत सुनावले. त्यानंतर ते सर्वजण पोलिस ठाण्यातून निघून गेले. यापूर्वी ‘एस.टी.’ गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार याचाही वाढदिवस पोलिसांनी उधळून लावला होता.



रागाने काय बघतोस?
डॉ. बांदिवडेकर व त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात वारंवार विनंती करीत होते. शहर पोलिस उपअधीक्षक राणे ‘परवानगी मिळणार नाही,’ या मुद्द्यावर ठाम होते. बांदिवडेकर याच्या एका अभियंता मित्राने डोळे मोठे करून रागाने त्यांच्याकडे पाहिले. हे पाहून राणे संतापले, ‘रागाने काय बघतोस? मी मुंबईमध्ये नोकरी केली आहे. असे गुन्हेगार खूप पाहिलेत. तुम्ही काय नवीन नाही आहात. परवानगी नाही. चला, उठा!’ असे त्यांना खडे बोल सुनावले. त्यानंतर डॉ. बांदिवडेकर, ‘साहेब, तुम्हाला नंतर भेटायला येतो,’ असे म्हणून निघून गेला.
घरगुती कार्यक्रम
पोलिसांनी परवानगी नाकारल्याने बांदिवडेकर याने स्वत:च्या राजारामपुरीतील घरी साधेपणाने वाढदिवस साजरा केला. निवडक लोकांनाच जेवणाचे निमंत्रण दिले होते. पोलिसांनी मुस्कॉन लॉनवर रात्री
उशिरापर्यंत बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Permission denied on the birthday of Bhahede Dikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.