सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी, जिल्हाधिकारी देसाई यांचे आदेश : क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 08:00 PM2020-11-20T20:00:38+5:302020-11-20T20:01:57+5:30
coronavirus, collcatoroffice, kolhapurnews बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागांतील सांस्कृतिक कार्यक्रमांना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिली आहे. सभागृहात क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असणे बंधनकारक आहे.
कोल्हापूर : बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागांतील सांस्कृतिक कार्यक्रमांना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिली आहे. सभागृहात क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असणे बंधनकारक आहे.
कोरोनामुळे गेलले आठ महिने जिल्ह्यातील सभागृहांमधील व मोकळ्या जागांतील कार्यक्रमांना बंदी होती. आता ती उठवण्यात आल्याने सभा, समारंभ, मेळावे, व्याख्याने, साांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली असून सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देण्यात यावे.
सभागृहाच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये. प्रेक्षकांमध्ये सामाजिक अंतर, कलाकारांची वैद्यकीय तपासणी, खोल्या, प्रसाधनगृहांची वारंवार स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सर्वांनी मास्कचा वापर, साधनसामग्री वापराची दक्षता, रंगभूषाकारांना पीपीई किट धारण करणे आवश्यक आहे. बंदिस्त सभागृहात प्रवेश करतेवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे.
सभागृहात खाद्यपदार्थांची व पेय पदार्थांची पोचवणी करण्यास मनाई करण्यात आली आहे. थुंकी उत्पन्न कराणारे पदार्थ जसे की तंबाखूजन्य पदार्थ व पान हे बाळगण्यास मनाई राहील. नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन करून कार्यक्रमाच्या ठिकाणी येता येणार नाही. थर्मल गन, सॅनिटायझर कार्यक्रमाच्या ठिकाणी असावेत व आयोजकांनी तपासणी करूनच प्रवेश द्यावा. मोकळे मैदान, रस्ता, खुले सभागृह येथे कार्यक्रम असल्यास बसण्यासाठी याकरिता मार्किंग करावे व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात यावे; अन्यथा संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.