बुधवारपासून जिल्ह्यातील निवासी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊसना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 04:24 PM2020-07-07T16:24:50+5:302020-07-07T16:26:09+5:30
राज्य शासनाच्या निर्देशानुसार बुधवारपासून जिल्ह्यातील निवास व्यवस्था करणारी हॉटेल्स, लॉज व गेस्ट हाऊस ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश काढून अटी व शर्तींच्या नियमांचे पालन करीत व्यावसायिकांनी हे व्यवसाय सुरू करावेत; अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
कोल्हापूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार बुधवारपासून जिल्ह्यातील निवास व्यवस्था करणारी हॉटेल्स, लॉज व गेस्ट हाऊस ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश काढून अटी व शर्तींच्या नियमांचे पालन करीत व्यावसायिकांनी हे व्यवसाय सुरू करावेत; अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार निवासाची सोय करणाऱ्या हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊसनी कोरोना प्रतिबंधात्मक सूचना दर्शनी भागात लावणे गरजेचे असून प्रवेशद्वारात थर्मल स्क्रीनिंग, संरक्षक काच बसवणे गरजेचे आहे. यासह प्रवाशांसाठी हँड सॅनिटायझर, सेंन्सर डिस्पेन्सर, मास्क, ग्लोव्हज, उपलब्ध करून देणे, चेक इन, चेक आऊट व अन्य सुविधांसाठी क्युआर कोड, ऑनलाईन फॉर्म, डिजिटल पेमेंट या प्रणालींचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. यासह सामाजिक अंतर, ई मेनू, डिस्पोजेबल पेपर नॅपकिनचा वापर करण्यास सांगितले आहे.
प्रवाशांनाही स्वागत कक्षाच्या ठिकाणी प्रवासाचा तपशील, वैद्यकीय स्थिती, फोटो, ओळखपत्र अशी माहिती देणे, आरोग्य सेतू ॲप वापरणे बंधनकारक आहे. या ठिकाणी गेमिंग आर्केड, खेळण्याची ठिकाणे, जलतरण तलाव, करमणूक केंद्रे, मोठी संमेलने या बाबींना परवानगी दिलेली नाही.
यासह आस्थापनांनी खोल्या व अन्य सेवांच्या जागांचे साहित्य व वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. एखादी व्यक्ती संशयित किंवा आजारी असेल तर तिचे विलगीकरण करण्यात यावे. एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.