पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, प्रकाश आवाडेंच्या मागणीला फडणवीसांचा होकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:17 PM2022-08-12T12:17:45+5:302022-08-12T12:58:32+5:30
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे मूर्तींची उंची, मिरवणुकांवर बंधने यामुळे मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडामध्ये किंवा शहापूर खणीमध्ये करण्यात येत होते, परंतु आता शासनाने मूर्तींच्या उंचीवरील बंधने हटवली आहेत.
कोल्हापूर : इचलकरंजीतील घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित करण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली आहे. आवाडे यांनी याबाबत बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि याबाबत निवेदन दिले होते. याच पत्रावर फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्याचे सांगितले.
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे मूर्तींची उंची, मिरवणुकांवर बंधने यामुळे मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडामध्ये किंवा शहापूर खणीमध्ये करण्यात येत होते, परंतु आता शासनाने मूर्तींच्या उंचीवरील बंधने हटवली आहेत. शेवटच्या पाच दिवसांत ध्वनिक्षेपकांचा आवाज सुरू ठेवण्यासाठी रात्री १२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक आल्यानंतर ती नदीवेसीतून पुन्हा शहापूर खणीकडे नेणे हे कोणाच्या तरी सांगण्यावरून करण्यात आले होते. परंतु आता फडणवीस यांनी ही परवानगी दिल्यानंतर अतिशय उत्साही वातावरणात पंचगंगा नदीतच विसर्जन होईल, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.