लाडक्या बाप्पांचे धुमधडाक्यात होणार आगमन, साऊंड सिस्टिमला ही मिळाली परवानगी; पण..
By इंदुमती सूर्यवंशी | Published: August 30, 2022 04:41 PM2022-08-30T16:41:07+5:302022-08-30T16:41:56+5:30
तरुण मंडळाकडून बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी
कोल्हापूर: कोरोना महामारीनंतर तीन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. उद्या, बुधवारी घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. तर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असल्याने तरुण मंडळाकडून बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली आहे. यातच तरुण मंडळांनी जिल्हा प्रशासनाकडे साऊंड सिस्टिमला देखील परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. या मागणीचा विचार करुन जिल्हा प्रशासनाने ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यामुळे मोठ्या धुमधडाक्यात गणरायाचे आगमन होणार आहे.
सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत 14 सुटीचे दिवस यापूर्वी घोषीत करण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत एक दिवस आवश्यकतेनुसार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला असून यानुसार ही सुट देण्यात आली आहे.
साऊंड सिस्टिमचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासुन रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल. यासाठी पोलीस विभागाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. तर, जिल्ह्यासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत घोषीत करण्यात आलेल्या 14 सुटीच्या दिवसात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
बाजारपेठेला उधाण.. रस्ते झाले पॅक
उत्सवाला फक्त एक दिवस राहिल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी जणू अख्खे कोल्हापूर रस्त्यावर आले आहे. शहरातील महापालिकेमागील कटलरी मार्केट, पापाची तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, राजारामपुरी अशा प्रमुख बाजारपेठांमध्ये आरासाच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली आहे. पान, फळं, फुलांच्या माळा, तोरण, विद्युत रोषणाई, मखर, फुलदाणी अशा अनेक आकर्षक साहित्य मन मोहून घेत आहे. उत्सवाच्या तयारीसाठी शहर रस्त्यावर आल्याने प्रत्येक चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे.
घरोघरी लगबग
बाप्पांच्या आगमनाला आता एक दिवस राहिल्याने घरोघरी उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. घरादाराची साफसफाई, गेल्यावर्षी माळावर काढून ठेवलेले सजावटीचे साहित्य काढणे, ते सुस्थितीत आहेत का बघणे, नव्या साहित्यांची यादी, विद्युत रोषणाईसाठीच्या माळांची जोडणी, यावर्षी कोणती आरास करायची, काय थीम ठेवायची याचा विचार करून सजावट केली जात आहे.