पेरणोली उपआरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:53+5:302021-09-06T04:27:53+5:30
पेरणोली : पेरणोली (ता. आजरा) येथील उपआरोग्य केंद्रात गेली दहा वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यासह सामुदायिक आरोग्य अधिकारी नसल्याने पेरणोली परिसरातील ...
पेरणोली : पेरणोली (ता. आजरा) येथील उपआरोग्य केंद्रात गेली दहा वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यासह सामुदायिक आरोग्य अधिकारी नसल्याने पेरणोली परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यास गैरसोय होत आहे.
पेरणोलीसह हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, साळगाव, वझरे आदी गावांना उपआरोग्य केंद्र उपयुक्त ठरत आहे. प्राथमिक उपचारासह गर्भवती महिलांची देखपाल, तपासणी व प्रसूती होत असल्याने नागरिकांचा हे केंद्र आधारवड बनले होते. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी व सामुदायिक आरोग्य अधिकारी ही दोन महत्त्वाची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती झाली होती; पण कोरोनामुळे कोविडकडे रुजू केल्याने पुन्हा हे पद रिक्त झाले आहे. कोरोनाच्या काळात दोन आरोग्य सेवक, दोन आशा सेविका व मदतनीस यांच्या जिवावर उपकेंद्राचा कारभार सुरू आहे. अधिकारी नसतानाही उत्तम आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न केला असतानाच केंद्र शासनाने एका आरोग्यसेविकेला अचानक डच्चू दिला, तर परमनंट आरोग्य सेवकाची सध्या बदली झाल्याने आशासेविका व मदतनिसांवर केंद्र चालवण्याची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधींनी वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवकांची तात्काळ भरती करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
- रिक्त पदे अशी :
वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्यधिकारी, पर्मनंट आरोग्यसेवक, राष्ट्रीय ग्रमीण अभियानांतर्गत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका.
फोटो ओळी : पेरणोली (ता. आजरा) येथील वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी वंचित असलेले उपआरोग्य केंद्र.
क्रमांक : ०५०९२०२१-गड-०१