माथाडीच्या नावाखाली उद्योजकांचा छळ--‘लोकमत’चे कौतुक
By Admin | Published: February 11, 2015 11:34 PM2015-02-11T23:34:28+5:302015-02-12T00:29:32+5:30
सुभाष देसाई : कामगार व उद्योजकांचे हित साधून कृती आराखडा तयार करणार
कुपवाड : औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या माथाडी कामगार कायद्याचा दुरूपयोग सुरू आहे. या कायद्याच्या माध्यमातून काही धंदेवाईक प्रवृत्तीचे लोक उद्योजकांची छळवणूक करीत आहेत. या गोष्टींना आळा घालण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्यामध्ये कामगारांच्या हिताला कोठेही धक्का लागणार नाही आणि उद्योजकांचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (बुधवारी) व्यक्त केले.
कुपवाड एमआयडीसीमधील ९ कोटी ६० लाखांच्या रस्ते कामाचे उद्घाटन उद्योगमंत्री देसाई यांच्याहस्ते झाले. त्यानंतर सूरज ललित कला अकादमीमध्ये आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार संभाजी पवार, उद्योजक प्रवीण लुंकड, कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, सतीश मालू, उपाध्यक्ष डी. के. चौगुले उपस्थित होते.
यावेळी देसाई म्हणाले की, राज्यामध्ये सध्या विजेचे संकट असून, उद्योगधंद्यांना महागड्या दराने वीज पुरविली जाते. वीज दरात कपातीसाठी उपाययोजनेचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात पाच लाख शेतकऱ्यांना सोलर पंप वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे विजेची बचत होऊन उद्योगांचा वीज दरही कमी होईल.
उद्योजकांनी अशाप्रकारची चर्चासत्रे आयोजित केल्यामुळे उद्योगासंबंधी विचारमंथन घडून येते. त्यातून उद्योगांच्या अडीअडचणी समजतात. नवीन संकल्पनांची प्रचिती येते. उद्योगधंद्यांबाबतचा राज्यस्तरीय आराखडा तयार करताना, अशा चर्चासत्राचा उपयोग होतो, अशा शब्दात त्यांनी चर्चासत्राच्या आयोजनाचे कौतुक केले. आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले की, उद्योग खात्याने एमआयडीसी क्षेत्रात प्राथमिक सोयी-सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात. उद्योजक प्रवीण लुंकड म्हणाले की, फूड प्रोसेसिंगसाठी लागणारा कच्चा माल जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उपलब्ध होत आहे. शेतीला यातून चालना मिळेल. यावेळी शिवाजी पाटील, नगरसेवक गौतम पवार, सचिन पाटील, बापूसाहेब येसुगडे आदींची भाषणे झाली. यावेळी भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष रमेश आरवाडे, एन. जी. कामत, अण्णासाहेब कोरे, रवींद्र कोंडुसकर, चंद्रकांत पाटील, आयुब मकानदार, अनंत चिमड, सागर पाटील, रमाकांत मालू, बजरंग पाटील, पृथ्वीराज पवार, आनंदराव पवार, विकास सूर्यवंशी, पांडुरंग रूपनर, संजय बेडगे उपस्थित होते. (वार्ताहर)
एसईझेड प्रस्तावात सुधारणा करण्याचे प्रयत्न
एसईझेड (स्पेशल इकॉनॉमिक झोन) प्रस्तावात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एसईझेडचे जे प्रस्ताव उद्योग खात्याकडे सादर झाले आहेत, त्यांचे पुनर्विलोकन करण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रात सेक्टरवाईझ क्लस्टर डेव्हलपमेंट (सामुदायिक सुविधा) योजना राबविण्यावर भर देण्यात आहे. सांगली जिल्ह्यात फूड पार्कसाठी पूरक परिस्थिती आहे. त्यामध्ये शेती आणि खाद्यपदार्थ उद्योगांना सामावून घेता येईल, असे देसाई म्हणाले.
‘लोकमत’चे कौतुक
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने बुधवारी ‘प्रश्नांच्या गर्दीत उद्योजकांची घुसमट’ या मथळ्याखाली जिल्ह्यातील उद्योजकांच्या प्रश्नांचा सर्वांगांनी ऊहापोह करणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. सकाळीच सांगलीत आलेल्या देसाई यांनी हे वृत्त वाचल्यानंतर ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ‘लोकमत’ने सांगली जिल्ह्यातील उद्योजकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अनेक नवे प्रश्न यामुळे लक्षात आले. प्रश्न सोडवण्यासाठी आमचे त्याच दिशेने प्रयत्न सुरू आहेत. शासनाने केलेल्या प्रयत्नांबद्दल एकीकडे प्रशंसा करतानाच परखड शब्दात उणिवाही मांडण्यात आल्या आहेत’, अशा शब्दात कौतुक करताना त्यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले. कुपवाड येथील चर्चासत्रामध्येही त्यांनी उद्योजक व राजकीय कार्यकर्त्यांसमोर ‘लोकमत’च्या वृत्ताचा वारंवार उल्लेख केला आणि अभिनंदन केले. शासन कारभारातील त्रुटी जाणवून द्याव्यात, सरकारवर टीका-टिप्पणी जरूर करावी, पण अभ्यास करून सामाजिक प्रश्नही मांडावेत, ही प्रसारमाध्यमांची मुख्य भूमिका ‘लोकमत’ने पार पाडली आहे, अशा शब्दात त्यांनी गौरव केला.