स्वॅब न दिलेल्या व्यक्तीचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:56+5:302021-08-12T04:27:56+5:30
सरुड : कोरोना चाचणीसाठी स्वॅब न दिलेल्या सरुड ( ता. शाहूवाडी ) येथील एका ४४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना ...
सरुड : कोरोना चाचणीसाठी स्वॅब न दिलेल्या सरुड ( ता. शाहूवाडी ) येथील एका ४४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल चक्क पॉझिटिव्ह दाखविण्यात आल्याने स्वॅब तपासणीमधील आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सरुड येथे मॅसिव्ह स्वॅब ड्राईव्ह या मोहिमेअंतर्गत संबंधित व्यक्तीच्या घरामध्ये स्वॅब घेण्यासाठी गेलेल्या पथकाने त्या व्यक्तीच्या पत्नीचा स्वॅब आर. टी. पी. सी. आर. तपासणीसाठी घेतला. त्यानंतर त्यांनी घरात उपस्थित नसलेले तिचा पती व सासू, सासरे अशा तीन व्यक्तींचे मोबाईल नंबर घेतले . या मोहिमेंतर्गत घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्वॅब दिलेल्या त्या महिलेसह स्वॅब न दिलेल्या तिच्या पती व सासू, सासऱ्यांच्याही अहवालाचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला . यामध्ये संबंधित महिलेच्या पतीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, तर तिच्या सासू, सासऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह दाखविण्यात आला आहे. संबंधित महिलेचा अहवालही निगेटिव्ह आला आहे . जर स्वॅबच तपासणीसाठी दिलेला नाही तर स्वॅब न दिलेल्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह कसा आला ? असा सवाल नागरिकांच्याकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकाराने कोरोनाकाळातील आरोग्य यंत्रणेतील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असून आरोग्य यंत्रणेच्या स्वॅब चाचण्यांवर व नागरिकांचे येत असलेल्या स्वॅब तपासणीच्या अहवालाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.