शिक्षक ते शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारे व्यक्तिमत्त्व; कोल्हापूरच्या मातीशी नाते : आयुष्याचा देदीप्यमान आलेख प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:13+5:302021-04-24T04:25:13+5:30

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील सामान्य कुटुंबातील मुलगा ते जागतिक दर्जाचा शिक्षक, संशोधक आणि काही दशके जगाच्या ...

Personality from teacher to radical change in education; Relationship with the soil of Kolhapur: Inspirational graph of life inspiring | शिक्षक ते शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारे व्यक्तिमत्त्व; कोल्हापूरच्या मातीशी नाते : आयुष्याचा देदीप्यमान आलेख प्रेरणादायी

शिक्षक ते शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारे व्यक्तिमत्त्व; कोल्हापूरच्या मातीशी नाते : आयुष्याचा देदीप्यमान आलेख प्रेरणादायी

Next

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील सामान्य कुटुंबातील मुलगा ते जागतिक दर्जाचा शिक्षक, संशोधक आणि काही दशके जगाच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवून आणणारी व्यक्ती असाच डॉ. अरुण निगवेकर यांच्या आयुष्याचा देदीप्यमान आलेख आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कोल्हापूरशी जोडलेल्या आठवणी पुन्हा जाग्या झाला. कोल्हापूरच्या मातीला अभिमान वाटावा असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

निगवेकर कुटुंबीय मूळचे शेती करायचे; परंतु त्यांच्या आजोबांना आपल्या मुलांनी निगवे सोडून इतरत्र जावे व शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असे वाटे. निगवेकर यांचे वडील त्याकाळी इंजनिअरिंगचे पदवीधर होते. साधारणत: १९४० ते ५० पर्यंतचा हा काळ होता. निगवेकर कुटुंबीय त्याकाळी शाहूपुरी चौथ्या गल्लीत राहायचे. त्यांचे शिक्षण बँच राजाराम हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या वडिलांना इंग्रजी शिक्षणाबद्दल कमालीची ओढ होती. त्याकाळी ते मुलांना इंग्रजी वृत्तपत्र आणून वाचायला देत असत. गॅसबत्तीभोवती चार भावंडांसोबत निगवेकर अभ्यास करून शिकले. राजाराम महाविद्यालयातून ते पदवीधर झाले. तिथे विज्ञान विभागातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दोन वर्षे पुढील शिक्षणासाठी दरमहा ६० रुपये शिष्यवृत्ती कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून दिली जात असे. त्या आर्थिक मदतीतून ते पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एम.एस्सी. झाले. राजाराम महाविद्यालयातील इंग्रजीचे भाषातज्ज्ञ प्रा. डॉ. व्ही.के. गोकाक, ज्ञानपीठ विजेते वि.स. खांडेकर व ज्येष्ठ साहित्यिक ना.सी. फडके यांचा निगवेकर यांच्या जीवनावर मोठा प्रभाव राहिला. त्यांनी शिक्षण हेच जीवनाचे आव्हान मानले. शिक्षक होणे हे त्यांना नेहमीच आव्हानात्मक वाटले म्हणूनच त्यांनी हे क्षेत्र उत्साहाने निवडले. त्यांना पदवीला ५८.५० टक्के गुण होते. छत्रपती घराण्याने शिष्यवृत्ती दिल्यानेच आपल्याला पुणे येथील शिक्षणाची कवाडे उघडी झाली व त्यातूनच पुढे जगभरातील संधीची कवाडे खुली झाली, अशी त्यांची भावना होती. त्यांनी उत्तम संशोधन केले. शिक्षण क्षेत्रात सर्वोच्चस्थानी असलेल्या युनेस्को या संस्थेशीही ते अनेक वर्षे जोडले होते. डॉ. निगवेकर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान हे देशासाठी मैलाचा दगड ठरावा इतके मोलाचे होते. शिक्षण क्षेत्रात पाच दशके विविध बदल घडविणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षणाचा दर्जा आणि संख्यात्मक सुधारणा यावर त्यांनी अनेक वर्षे काम केले.

नॅकच्या स्थापनेत योगदान

पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते; परंतु सुरुवातीला ते शिक्षणमंत्री होते. कॅनडाहून त्यांनी जी. राम रेड्डी यांना यूजीसीचे अध्यक्ष म्हणून बोलावले. जेव्हा डॉ. निगवेकर यांनी नॅकची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयाला ते बांधील राहिले. निगवेकर यांनीच नॅकची निर्मिती करण्याचे आव्हान स्वीकारावे, अशी त्यांनी जबरदस्तीच केली. नॅशनल ॲससेमेंट ॲण्ड ॲक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) हे नावही निगवेकर यांनीच सुचविले आहे.

Web Title: Personality from teacher to radical change in education; Relationship with the soil of Kolhapur: Inspirational graph of life inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.