Maharashtra Assembly Election 2019 चंद्रकांत जाधव यांच्या विजयामुळे पेठेला प्रथमच आमदरकी- मंगळवार पेठेत दिवाळीपूर्वी दिवाळी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 05:20 PM2019-10-24T17:20:50+5:302019-10-24T18:40:24+5:30

उत्तरमधील निवडणूक ऐतिहासिक ठरली. मंगळवार पेठेला प्रथमच आमदारकी मिळाली. त्यामुळे पेठेत उत्साहाचे वातावरण होते. येथे दिवाळीपूर्वीच दिवाळी झाली.

 Petha for the first time as a winner of Chandrakant Jadhav | Maharashtra Assembly Election 2019 चंद्रकांत जाधव यांच्या विजयामुळे पेठेला प्रथमच आमदरकी- मंगळवार पेठेत दिवाळीपूर्वी दिवाळी  

Maharashtra Assembly Election 2019 चंद्रकांत जाधव यांच्या विजयामुळे पेठेला प्रथमच आमदरकी- मंगळवार पेठेत दिवाळीपूर्वी दिवाळी  

Next
ठळक मुद्देरुईकर कॉलनी येथील माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. जाधव हे पाटाकडील तालीम मंडळाचे खंदे समर्थक व माजी खेळाडू असल्याने या तालीम मंडळाचा त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून पाठींबा होता.जनरेटर ’जप्त करण्याच्या पोलिसांना सुचना दिल्या. त्यामुळे युवकांनी एक पाऊल मागे येत ढोल ताशांवर जल्लोषास सुरूवात केली.

कोल्हापूर :  कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँगे्रसचे ऋतुराज पाटील तर कोल्हापूर उत्तरमधूनही काँगे्रसचेच चंद्रकांत जाधव यांनी बाजी मारली. यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. तर दुसरीकडे पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती.  उत्तरमधील निवडणूक ऐतिहासिक ठरली. मंगळवार पेठेला प्रथमच आमदारकी मिळाली. त्यामुळे पेठेत उत्साहाचे वातावरण होते. येथे दिवाळीपूर्वीच दिवाळी झाली.

विधानसभा निवडणूकीच्या निकालाची  गेल्या दोन दिवसांपासून उत्स्कुता लागून राहिली होती. कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर हे दोन्ही मतदार संघ शहरात येतात. दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील विरूदध अमल महाडिक असा थेट सामना होता. तर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर विरूदध चंद्रकांत जाधव अशी लढत होती. दोन्ही मतदार संघासाठी गुरूवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. पोस्टल मतदानापासूनच दुपारी १२ नंतर निकालाचा कल स्पष्ट होऊ लागले. आठव्या फेरीनंतरच दोन्ही मतदार संघातील चित्र स्पष्ट झाले. दहाव्या फेरीनंतर दुपारी २ वाजता दक्षिणमध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील तर उत्तरमध्ये चंद्रकांत जाधव विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर शहरामध्ये त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. 

पीटीएम परिसरात दिवाळी पूर्वी दिवाळी 
चंद्रकांत जाधव मुळचे मंगळवार पेठेतील पीटीएम तालीम मंडळ परिसरातील रहिवाशी आहेत. जाधव विजयी झाल्याचे वृत्त समजताच सर्व तालमीचे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शिवाजी स्टेडियम येथील प्रचार कार्यालयाजवळ समर्थकांनी गर्दी केली. साऊंड सिस्टिमने परिसर दणाणून गेला होता. समर्थकांनी गुलालाची उधळण करत चंद्रकांत जाधव यांच्या जयघोष केला. पीटीएम परिसरात दिवाळी पूर्वीच दिवाळी झाली.

चोख पोलीस बंदोबस्त 
निकालानंतर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले होते. शहरातील प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये शिवाजी चौक, बिंदू चौक, उभा मारूती, कावळा नाका, गोखले कॉलेज, फिरंगाई तालीम या परिसरासह विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्या कार्यालय तसेच निवासस्थानही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाजी स्टेडियम येथील चंद्रकांत जाधव यांच्या प्रचार कार्यालय परिसरात समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. साऊंड सिस्टिमही लावली होती. पोलीसांनी वेळीच येऊन त्यांना अटकाव केला. 

फटाके, गुलाल खरेदीसाठी गर्दी 
विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी चौका-चौकात गुलालांची उधळण व आतषबाजी केली. पापाची तिकटी, महापालिका परिसरातील फटाके व गुलाल खरेदीसाठी दुकांनामध्ये गर्दी झाली होती. तसेच समर्थकांनी शहरामध्ये विजयी उमेदवारांचे फलकही लावले.

काही ठिकाणी जल्लोष, काही ठिकाणी सन्नाटा  
निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या निवासस्थान, कार्यालय या ठिकाणी समर्थकांनी जल्लोष केला. यामध्ये ऋतुराज पाटील विजयी झाल्याने ताराबाई पार्कातील अजिंक्यतारा येथील कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. चंद्रकांत जाधव यांच्या सम्राटनगर येथील निवासस्थानी तसेच शिवाजी स्टेडियम येथील प्रचार कार्यालयासमोर समर्थकांनी जल्लोष केला. तर पराभूत उमेदवार अमल महडिक यांच्या शाहुपूरी येथील प्रचार कार्यालय तसेच राजेश  क्षीरसागर यांच्या निवास्थानी शुकशुकाट होता. रुईकर कॉलनी येथील माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. 

जाधव यांच्या विजयाची चर्चा ‘फुटबॉल‘ भोवतीच

कोल्हापूर : सामना पिवळ्या निळ्यांमध्ये असो अन्य संघांबरोबर असो त्यात समर्थक, खेळाडू आणि हितचिंतकांमध्ये टोकाची इर्षा अन् चुरस नित्याचीच ठरलेली बाब. असे चित्र शाहू स्टेडियममध्ये प्रेक्षक गॅलरीसह मैदानातही हमखास पाहण्यास मिळणारच . मात्र, गुरूवारी याच्या उलटे चित्र पाहण्यास मिळाले. उत्तर मतदार संघातील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या विजयानिमित्त झालेल्या जल्लोषात फुटबॉल सामन्यांनिमित्त एकमेकांविरोधात ठाकणाऱ्या बहुतांशी संघातील आजी माजी खेळाडूंसह म्होरकेही सहभागी झाले होते. यात जाधव विजयी झाले तरी चर्चा मात्र, फुटबॉलचीच होती.
जाधव हे पाटाकडील तालीम मंडळाचे खंदे समर्थक व माजी खेळाडू असल्याने या तालीम मंडळाचा त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून पाठींबा होता. त्यात कोल्हापूरच्या पहिल्या व्यावसायिक संघाची अर्थात ‘ कोल्हापूर एफसी ‘ ची मोट बांधणारे एकमेव उद्योजक आणि फुटबॉल प्रेमी म्हणून ते सर्व फुटबॉल संघांमध्ये सुपरिचित आहेत. त्यामुळे त्यांचा विजय म्हणजे फुटबॉलचा विजय असे समजून जुने जाणते फुटबॉलपटूंसह आजी फुटबॉलपटू त्यांच्या प्रचारात अग्रभागी होते. यात पाटाकडील तालीम मंडळाचा पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ असणा-या दिलबहार तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, संध्यामठ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, शिवाजी तरूण मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, संध्यामठ तरूण मंडळ, अशी बहुतांशी फुटबॉल संघाचे खेळाडू , समर्थकांचा समावेश होता. त्यामुळे त्यांचा विजय अर्थात फुटबॉलचा विकास असे गणित या संघाच्या सर्व कार्यकर्त्यां्नी मनाशी खुणगाठ बांधली होती. त्यानूसार सर्वांनी प्रचार करीत जाधव यांना विजयी केले. विजयी जल्लोषात ही मंडळी सहभागीही झाली. तेथे पण विजय केवळ फुटबॉलचाच म्हणून आणखी जोरात जल्लोष या मंडळींनी केला.

 

चंद्रकांत जाधव संर्पक कार्यालय परिसर ; अवघी तरूणाई सहभागी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मधून प्रथमच निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या शिवाजी स्टेडियम येथील संर्पक कार्यालयाच्या परिसरात जाधव हे नजीकचे शिवसेना विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर पहिल्या फेरीतच ४, ७८० मतानी पुढे असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांसह साऊंड सिस्टिम व फटाक्यांची अतिषबाजी करीत एकच जल्लोष केला. यात अवघी तरूणाई सहभागी झाली होती.

विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर जाधव यांचे प्रथम संर्पक कार्यालय खासबाग परिसरात होते. येथे महापालिकेची प्राथमिक शाळा असल्याने या परिसरातून त्यांनी आपले कार्यालय शिवाजी स्टेडियम येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात हलविले. येथे मोठा मंडप घालून येथूनच प्रचाराची सुत्रेही हलविली. त्यामुळे हे संर्पक कार्यालयाच प्रचाराचा केंद्रबिंदु ठरला. त्यामुळे गुरूवारी सकाळपासून मतमोजणीला सुरूवात होताच या कार्यालयात शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, आदी ठिकाणाहून कार्यकर्ते दाखल होण्यास सुरूवात झाली. त्यात प्रतिस्पर्धी उमेदवार क्षीरसागर यांच्यावर मात केल्याचे समजताच जल्लोषाला मोठी धार आली. त्यात हजारो युवक सहभागी झाले. ढोलताशासंह साऊंड सिस्टिम वर ही तरूणाई अगदी धुंद होवून जल्लोष करू लागली. हा उत्साह विजयी उमेदवार जाधव हे दुपारी तीन वाजता या ठिकाणी दाखल झाल्यानंतर शिगेला पोहचला. त्यांच्यावर गुलाल, फुलांची मुक्त उधळण करण्यात आली. त्यानंतर जाधव हे विजयाचे प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी मतमोजणी केंद्राकडे कार्यकर्त्यांसह रवाना झाले.

डिजे साऊंड सिस्टिमला पोलीसांचा अटकाव
विजयीप्रित्यार्थ युवकांनी या परिसरात मोठ्या डिजे साऊंड सिस्टिम लावून जल्लोषास सुरूवात केली. काही वेळातच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव फौज फाट्यासह दाखल झाले. त्यांनी या गुलाल उधळण्याास व मोठ्या साऊंडसिस्टिम लावण्यास मनाई असल्याचे सांगत ‘ जनरेटर ’जप्त करण्याच्या पोलिसांना सुचना दिल्या. त्यामुळे युवकांनी एक पाऊल मागे येत ढोल ताशांवर जल्लोषास सुरूवात केली.

Web Title:  Petha for the first time as a winner of Chandrakant Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.