पेठवडगावचे पोलीस निरीक्षक गोकावेवर गुन्हा
By admin | Published: August 11, 2015 12:59 AM2015-08-11T00:59:15+5:302015-08-11T00:59:15+5:30
‘लाचलुचपत’ची कारवाई : २९ टक्के अधिक मालमत्ता
पुणे /पेठवडगाव : पेठवडगावचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार नीळकंठ गोकावे (वय ४७) यांच्यासह दोन पत्नी आणि आई-वडिलांविरुद्ध पुण्यातील वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत गोकावे आणि त्यांच्या कुटुंबीयांची उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा
२९ टक्के अधिक मालमत्ता आढळून आली. पुणे विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही माहिती दिली.
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वाहतूक विभागाचे निरीक्षक म्हणून काम करीत असताना गोकावे यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू करण्यात आली होती. गोकावे यांनी नोकरीच्या एकूण २१ वर्षांच्या (१९९३ ते २०१४) कालावधीमध्ये एकूण ७४ लाख ४१ हजार ७९३ रुपयांची अधिक मालमत्ता धारण केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. ही बेहिशेबी मालमत्ता धारण करण्यासाठी त्यांची पत्नी जयश्री ऊर्फ नेहा नितीन गोकावे, अनुराधा नितीन गोकावे, वडील नीळकंठ रामचंद्र गोकावे, आई लता नीळकंठ गोकावे (सर्व रा. आदित्य गार्डन सिटी, वारजे-माळवाडी) यांनी अपप्रेरणा दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. गोकावे मूळचे सांगली जिल्ह्यातील माधवनगर येथील रविवार पेठेतील राहणारे आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलात असताना गोकावे कायमच वादात राहिले आहेत.(पान १ वरून)
त्यांच्या पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील स्थावर आणि जंगम मालमत्तांची झडती लाचलुचपतकडून घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र गायकवाड तपास करीत आहेत.
लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली पेठवडगावातील निवासस्थानाची पाहणी
पेठवडगाव येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केल्यामुळे शहर व पोलीस ठाणे हद्दीत खळबळ माजली आहे, तर सोमवारी सकाळी वडगाव येथे ते राहत असलेल्या खोलीची पाहणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली. मात्र आक्षेपार्ह काही मिळून आले नाही, असे समजते.
४ आॅगस्टला गोकावे यांची वडगाव पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. पहिल्याच दिवसात त्यांनी पोलीस प्रशासनाची झलक नागरिकांना दाखवून दिली. कार्यालयात पोलिसांव्यतिरिक्त अन्य वावर असलेल्या अनेकांची हकालपट्टी केली. पुन्हा दिसल्यास कारवाई करण्याची धमकी दिली होती.
शहरात अनेक वर्षांपासून दुचाकी वाहनधारकांची परवाना तपासणी करण्यात आली नव्हती. गोकावे यांनी शहरातील प्रमुख चौकात स्वत: थांबून धडक कारवाई केली. यावेळी तिब्बल सीट, दुचाकी वाहनधारक, महिला वाहनधारक यांच्या वाहनपरवान्याची तपासणी केली. तसेच कॉलेज सुटल्यानंतर रोडरोमिओंना प्रसाद दिला. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना संबंधित पोलिसांना दिल्या होत्या. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत होते. शहरात मारामारीप्रकरणी संशयित हल्लेखोरांनाही तत्काळ अटक केली होती, तर मनपाडळे येथेही बलात्कार प्रकरणातील संशयितास अटक केली होती. या पार्श्वभूमीवर गोकावे यांच्यावर कारवाई झाल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे.