विजयसिंह यादवांमुळे पेठवडगाव सुफलाम्

By admin | Published: July 25, 2016 12:33 AM2016-07-25T00:33:36+5:302016-07-25T00:33:36+5:30

पृथ्वीराज चव्हाण : यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पेठवडगावात अनावरण

Pethavdgaon Sufalam due to Vijaysingh Yadavas | विजयसिंह यादवांमुळे पेठवडगाव सुफलाम्

विजयसिंह यादवांमुळे पेठवडगाव सुफलाम्

Next

पेठवडगाव : सध्या राज्याला प्रामुख्याने पाणी आणि नागरीकरण हे दोन प्रश्न भेडसावत आहेत. नागरीकरणाच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर स्वर्गीय विजयसिंह यादव यांचे वडगावातील कार्य कौतुकास्पद असून, महाराष्ट्रात त्यांच्यासारखे चांगले काम अन्य कोणी केलेले नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे काढले. स्वर्गीय विजयसिंह यादव पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. एसटी स्टँडजवळ विजयसिंह यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण चव्हाण यांच्या हस्ते झाले. या चौकाला विजयसिंह यादव चौक असे नाव देण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार पतंगराव कदम, सुजित मिणचेकर, सतेज पाटील, उल्हास पाटील, आनंदराव पाटील, माजी मंत्री विनय कोरे, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, नगराध्यक्षा विद्या पोळ, विजयादेवी यादव, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात कोल्हापूर सोडले तर इतर जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. तसेच नागरीकरणाच्या बाबतीत काँग्रेस सरकारने सत्तेत असताना १३४ ग्रामपंचायतींना नगरपालिकेचा दर्जा दिला. खेड्यांचा विकास व्हावा म्हणून आम्ही नगरपालिकांना मंजुरी दिली. वडगावचे भाग्यविधाते स्वर्गीय विजयसिंह यादव यांनी ३२ वर्षे नगराध्यक्ष पद भूषविले. या काळात वडगाव सुजलाम् सुफलाम् केले आहे. ते काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. त्यांना वडगावच्या जनतेनेही भरभरून प्रेम दिले. विकासाच्या अनेक योजना त्यांनी राबविल्या आहेत. त्यांच्या समाजकार्याचा वारसा त्यांच्या कन्या विद्या पोळ यांनी जपला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत विद्या पोळ यांच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, विजयसिंह यादव यांच्यासारखा माणूस होणे नाही. ३२ वर्षे नगराध्यक्ष असताना त्यांनी सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडली आहे.
विधान परिषदेला यादवसाहेब काँगे्रसच्या तिकिटावर उभारले होते; पण काँग्रेसने त्यांना मदत केली नाही; मात्र वारणा समूहाने प्रामाणिकपणे मदत केली. काँगे्रस पाठीशी राहिला असता तर यादवसाहेब आमदार झाले असते, असेही विनय कोरे आपल्या भाषणात म्हणाले.
यावेळी नगराध्यक्षा विद्या पोळ म्हणाल्या, यादवसाहेबांना वडगावच्या जनतेने मोठी ताकत दिली. साहेबांनीही प्रत्येकाचा आदर राखला. येणारे प्रत्येक आव्हान हसतमुखाने पेलले. त्यांचे हे कार्य पुढे चालविण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे.
कार्यक्रमाचे स्वागत विद्या पोळ यांनी केले. आमदार सुजित मिणचेकर यांनी प्रास्ताविक केले.
माजी नगरसेवक सुनील हुकेरी यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार यशवंत पाटील, उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी, राजन शेटे, मुख्याधिकारी अतुल पाटील, संपत नायकवडी, आदींसह आजी-माजी नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.

Web Title: Pethavdgaon Sufalam due to Vijaysingh Yadavas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.