कोडोलीमध्ये नगर परिषद व्हावी यासाठी याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:14 AM2021-02-19T04:14:22+5:302021-02-19T04:14:22+5:30
कोल्हापूर : कोडोली नगर परिषद व्हावी म्हणून उच्च न्यायालयात कार्यकर्ते स्वप्निल सातवेकर यांनी ॲड. ...
कोल्हापूर : कोडोली नगर परिषद व्हावी म्हणून उच्च न्यायालयात कार्यकर्ते स्वप्निल सातवेकर यांनी ॲड. एकनाथ ढोकळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. सातवेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सातवेकर म्हणाले, कोडोली हे महसुली गाव असून तेथे नगर परिषद स्थापन करण्याबद्दल महाराष्ट्र शासनाने १९९३ सालीच अधिघोषणा केली होती. मात्र, शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यावर पुढे कार्यवाही झाली नाही. कोडोली ग्रामपंचायतीने व ग्रामसभेने तसे वेळोवेळी ठरावही केले आहेत. कोणत्याही गावी नगर परिषद स्थापन करण्यासाठी त्या गावची लोकसंख्या ही २५ हजारांच्या वर असणे व एकूण रोजगारापैकी ३५ टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार हा शेती व शेतीपूरक व्यवसायांव्यतिरिक्त व्यवसायांतून निर्माण झालेला असणे आवश्यक आहे. कोडोलीची लोकसंख्या २९००१ असून ५६ टक्क्यांपेक्षा अधिक रोजगार अन्य व्यवसायांतून निर्माण झाला आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाने घालून दिलेले हे दोन्ही महत्त्वाचे निकष कोडोली गावाकडून पूर्ण होत असल्यामुळे नगर परिषद स्थापन व्हावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.