माहिती लपविल्याची याचिका हे राजकीय षडयंत्र : चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 07:13 PM2020-08-22T19:13:36+5:302020-08-22T19:40:20+5:30
मी निवडणुकीचा अर्ज भरताना माहिती लपवल्याची याचिका हे राजकीय षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी केली आहे.
कोल्हापूर : मी निवडणुकीचा अर्ज भरताना माहिती लपवल्याची याचिका हे राजकीय षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी केली आहे.
पाटील म्हणाले, निवडणुकीच्या अर्जाच्या छाननीवेळीच याची शहानिशा करायची असते. निवडून आल्यानंतरही जर काही तक्रार असेल तर तीन महिन्यांत उच्च न्यायालयात निवडणूक याचिका म्हणून ती दाखल करावी लागते. येथे ११ महिने होऊन गेले आहेत.
यातील दोन कंपन्यांच्या मालकीचा जो उल्लेख आहे, तो मी त्या खात्याचा मंत्री असताना पदावर असलेल्या त्या कंपन्या आहेत. त्या माझ्या वैयक्तिक कंपन्या नाहीत. दोन्ही कंपन्या राज्याच्या कृषी विभागाशी संबंधित आहेत. मी त्यावेळी कृषिमंत्री होतो म्हणून तेथे पदावर होतो. आता न्यायालयाने याबाबत चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यातून सत्य काय ते बाहेर येणार आहे; परंतु केवळ राजकीय षड्यंत्राचा हा एक भाग आहे.