पेट्रोल अन् भाड्याचा मेळ बसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:45 AM2021-03-04T04:45:49+5:302021-03-04T04:45:49+5:30
कोल्हापूर : गेल्या महिनाभरापासून साध्या पेट्रोलची प्रतिलिटर १०० रुपयांकडे वाटचाल सुरू झाली आहे; तर स्पीड पेट्रोलने शतक केव्हाच पार ...
कोल्हापूर : गेल्या महिनाभरापासून साध्या पेट्रोलची प्रतिलिटर १०० रुपयांकडे वाटचाल सुरू झाली आहे; तर स्पीड पेट्रोलने शतक केव्हाच पार केले आहे. वाढत्या पेट्रोल आणि महागाईला तोंड देण्यासाठी १७ ऐवजी २५ रुपये किमान भाडेवाढ मिळावी, असा सूर रिक्षाचालकांतून उमटू लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलमध्ये दिवसाकाठी प्रतिलिटर ७० ते ८० पैसे वाढ होत आहे. दराच्या चढत्या आलेखामुळे सर्वसामान्यांसह रिक्षाचालकांचेही आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यात कोरोनामुळे मागील वर्षी अत्यल्प कमाई झाली आहे. पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाने मंदिरे, पर्यटनस्थळांवर निर्बंध घातले आहेत. पर्यटकांमुळे काहीअंशी होणारा रिक्षा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने रिक्षा व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यात पेट्रोलची भाववाढ खिशाला न सोसणारी आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षाचालकांना किमान भाडे २५ रुपये करावे, अशी मागणी रिक्षाचालकांकडून होऊ लागली आहे.
रिक्षाचालकांचा खर्च असा
महिन्याकाठी १२ ते १५ हजार रुपये, तर वर्षात लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यात पेट्रोल तीन हजार रुपये, वर्षभरात एकदा पासिंग, पीयूसी, दुरुस्ती, विमा, देखभाल खर्च असे २० हजार रुपये जातात. हातात महिन्याला सरासरी ८ हजार रुपये मिळतात. या अपुऱ्या उत्पन्नात घरामध्ये दोन महिन्यांतून एकदा गॅस सिलिंडर, मुलांचा शिक्षणखर्च, ज्येष्ठ मंडळींचे आजारपण अशांमुळे सावकारी किंवा वित्तीय संस्थांच्या कर्जामुळे सरतेशेवटी कर्जाचा बोजा अंगावर पडतो.
कोट
जिल्ह्यात १५ हजारांहून अधिक रिक्षा आहेत. त्यावर लाखभर लोक निर्भर आहेत. पेट्रोल दरवाढीमुळे त्यांचे संसार मोडकळीस आले आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत किमान २५ रुपये इतकी रिक्षा भाडेवाढ मिळावी.
- चंद्रकात भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेना
कोट
आम्हीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे अंग आहोत. त्यामुळे भाडेवाढीचा विचार सकारात्मक करून आमचे जीवन काहीअंशी सुसह्य करावे.
- विजय गायकवाड, कार्याध्यक्ष, जिल्हा वाहनधारक महासंघ